नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तीन वर्षपूर्तीच्या निमित्तानं आज दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहांची पत्रकार परिषद पार पडली. सर्जिकल स्ट्राईक, नोटबंदीपासून ते अगदी उज्ज्वला गॅस योजनेपर्यंत सरकारच्या कामगिरीचा पाढा त्यांनी यावेळी वाचला. अमित शहांच्या याच पत्रकार परिषदेत घडलेला एक भन्नाट किस्सा मात्र आज दिवसभर राजधानीत चर्चेचा विषय राहिला.


पत्रकार परिषद चालू असताना जेव्हा नेता काही हातवारे किंवा इतर हालचाल करतो तेव्हा असे अँक्शनमधले फोटो टिपण्यासाठी प्रिंट मीडियाचे कॅमेरे सज्ज असतात. आजही या पत्रकार परिषदेच्या दरम्यान योजनांवर बोलत असताना मध्येच अमित शहांनी खिशातला रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसायला सुरुवात केली. साहजिकच तेव्हा प्रिंट मीडियाच्या कॅमेराचे फ्लॅश जोरजोरात चमकू लागले. त्यावर अमित शहांनी हसत, "अरे भैय्या अब ये फोटो आपके काम आनेवाला नहीं है, हम अब कोई चुनाव हारनेवाले नहीं है" असं म्हटलं. त्यावर उपस्थितांमध्ये जोरजोरात हशा पिकला.

अमित शहांचा घाम पुसतानाचा फोटो मिळावा यासाठी जी धडपड सुरु होती, त्यावर त्यांचा हा टोला होता.नोटबंदीनंतर झालेली प्रत्येक निवडणूक भाजपनं जिंकलीय, त्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी हे विधान केलेलं होतं.