नालंदा (बिहार): बिहारच्या नालंदामध्ये धावत्या बसनं पेट घेतल्याची घटना घडली आहे. या आगीत होरपळून आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत.
नालंदा जिल्ह्यातल्या हरनौत बाजारमधून जाणारी बाबा रथ ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीच्या बसनं अचानक पेट घेतला. काही क्षणातच आगीनं रौद्ररुप धारण केलं. त्यातच आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.
स्थानिकांच्या मदतीनं अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं. बसच्या इंजिनवर ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आला होता. इंजिन गरम झाल्यावर या पदार्थानं अचानक पेट घेतला आणि अख्ख्या बसला आग लागली. अशी प्राथमिक माहिती समजते आहे.
बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते असं समजतं आहे. घटनेतील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच बिहार सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचारांचा खर्चही सरकारकडून करण्यात येणार आहे.