मुंबई : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याकडे जगाचं लक्ष आहे. याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या इच्छेविरोधात जाऊन भारत एस-400 ही वायु संरक्षण प्रणाली खरेदी करणार आहे. भारत 39 हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीत पाच S-400 सिस्टम घेणार आहे, ज्याची डिलीव्हरी 2020 पर्यंत होणं अपेक्षित आहे.


भारतासारख्या देशाला हवाई क्षेत्राचं संरक्षण हे मोठं आव्हान आहे. विशेष म्हणजे चीन आणि पाकिस्तानसारखे सतत कुरापती करणारे देश शेजारी असताना भारताला सज्ज असणं ही काळाची गरज आहे. भारतीय वायु सेनेची ताकद आणखी वाढवणारी एस-400 ही सिस्टम एक 'बूस्टर डोस' असेल, असं खुद्द एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ यांचं म्हणणं आहे.

काय आहे S-400?

ही एक एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम म्हणजे वायु संरक्षण प्रणाली आहे, जी जमिनीवरुनच शत्रूचं विमान 400 किमी अंतरावर पाडू शकते. 30 किमी उंची आणि 400 किमी दूर क्षेत्रातील कोणतंही लढाऊ विमान पाडण्याची यामध्ये क्षमता आहे.

S-400 एकाच वेळी 100 लक्ष्य ट्रॅक करु शकते, तर 36 लढाऊ विमानांवर एकाच वेळी हल्ला करु शकते.

रशियाची ही सर्वात अद्ययावत टेक्निक आहे, जी जमिनीवरुन जमीन, हवा आणि पाण्यातही शत्रूवर वार करु शकते.

S-400 ही S-300 या वायु संरक्षण प्रणालीचं पुढचं व्हर्जन आहे, जे रशियात 2007 पासून कार्यरत आहे. रशियाच्या पूर्वीच्या सिस्टमपेक्षा S-400 ही दुप्पट शक्तीशाली आहे, जी फक्त पाच मिनिटात कार्यरत होऊ शकते, असं आर्मी टेक्नॉलॉजी या वेबसाईटने म्हटलं आहे.

भारतासाठी S-400 चं महत्त्व काय?

पाकिस्तान आणि चीन हे अण्वस्त्र सज्ज देश भारताला लागून आहेत. पाकिस्तानच्या सीमेवर नेहमी कुरापती चालूच असतात. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, पाकिस्तानकडे F-16s ने अपग्रेडेड 20 पेक्षा अधिक फायटर स्क्वाड्रन्स आहेत. शिवाय पाकिस्तानला चीनने मोठ्या प्रमाणात जे-17 ही लढाऊ विमानेही दिली आहेत. तर चीनकडे 1700 लढाऊ विमाने आहेत, ज्यामध्ये 800 चौथ्या पिढीतील लढाऊ विमानांचा समावेश आहे.

S-400 ही शक्तीशाली लढाऊ विमानांना पाडण्याची क्षमता असलेली प्रणाली आहे. त्यामुळे भारतीय वायु सेनेची ताकद यामुळे वाढणार आहे.

अमेरिकेचा दबाव कशामुळे?

भारताने रशियासोबत हा करार करु नये, अशी अमेरिकेची इच्छा आहे. कारण, अमेरिकेच्या Countering America's Adversaries Through Sanctions Act (CAATSA) नुसार इराण, उत्तर कोरिया आणि रशियासोबत महत्त्वाचे व्यवहार केल्यास सँक्शन घातले जाऊ शकतात.

कोणकोणत्या देशांकडे S-400?

चीन हा पहिला देश आहे, ज्याने रशियाकडून S-400 ही वायु संरक्षण प्रणाली विकत घेतली. चीन आणि रशिया यांच्यात यासाठी 2014 मध्ये करार झाला होता, ज्यानंतर आता चीनला S-400 ची डिलीव्हरी मिळण्यासही सुरुवात झाली आहे. तुर्कीनेही गेल्या वर्षी रशियासोबत ही वायु संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी करार केला आहे, पण अमेरिकेने यावर तीव्र आक्षेप घेतला होता. भारताशिवाय रशिया कतारलाही S-400 पुरवण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ :