मुंबई : मराठीतील क्रमांक एकचं न्यूज चॅनल असणाऱ्या एबीपी माझानं सी व्होटरच्या माध्यमातून केलेलं पहिल्या टप्प्यातील देशव्यापी सर्वेक्षणाचे निष्कर्ष आज जाहीर करण्यात आले आहेत. एबीपी माझाच्या सर्वेक्षणानुसार सध्या आहे तशीच राजकीय समीकरणे कायम राहिलीत तर लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीए २७६ जागांसह स्पष्ट बहुमताने सत्तेत येईल. मात्र, जर भाजपाचा सर्वात जुना मित्रपक्ष असणारी शिवसेना आधी जाहीर केल्याप्रमाणे युती न करता स्वतंत्र लढली आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या काँग्रेसच्या मित्रपक्षांनी साथ कायम राखली तर यूपीए २४४ जागांसह पहिल्या क्रमांकावर राहील. तर इतर पक्षांना ७१ जागा मिळाल्यानं त्यांच्याहाती सत्तेची सुत्रे राहण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे सध्या जशी आहेत तशीच राहिलीत तर महाराष्ट्रात एनडीएला ३६ जागा मिळतील, म्हणजेच शिवसेना एनडीएसोबत असूनही २०१४ पेक्षा संख्याबळ पाचने घटेल. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या यूपीएला १२ जागांपर्यंत मजल मारता येईल. म्हणजेच जागांची संख्या २०१४च्या दुप्पट होईल.

शिवसेनेने घोषणा केल्याप्रमाणे स्वतंत्र बाणा दाखवला तर मात्र एनडीएला जबर फटका बसेल. फक्त १६ जागांवर समाधान मानावे लागेल. काँग्रेस राष्ट्रवादीची यूपीए तब्बल ३० जागांवर झेंडा फडकवेल. शिवसेनेला मात्र स्वतंत्र बाण्याची किंमत १६ जागा गमावून म्हणजेच फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागेल.

तिसरी शक्यता, प्रमुख चारही पक्ष स्वतंत्र लढले तर खरं बळ समोर येईल. त्यास्थितीत २२जागांसह भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरेल. काँग्रेस ११ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर, राष्ट्रवादी काँग्रेस ८ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर असेल. शिवसेना ७ जागांसह चौथ्या क्रमांकावर फेकली जाईल.

एबीपी माझाच्या देशाचा मूड सांगणाऱ्या या सर्वेक्षणात देशभरातील मतदारांना इतरही अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांना मिळालेली उत्तरेही देशाचा राजकीय मूड स्पष्ट करणारी आहेत. गावांपासून ते महानगरांपर्यंत महाराष्ट्राचा मूड काय आहे तेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

कोणता पक्ष देशापुढील प्रश्न सक्षणतेनं हाताळू शकतो? या कळीच्या प्रश्नावर उत्तर देणाऱ्यांनी भाजपाला पसंती दिली आहे. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादी आणि अन्यांचा आकडाही एकत्र केला तर तेवढाच आहे. पुन्हा काठावर बसून माहित नाही असे उत्तर देणारेही १८.१ टक्के आहेत.

कोणता पक्ष देशापुढील प्रश्न सक्षमतेनं हाताळू शकतो?

काँग्रेस २१.९

भाजपा ३२.६

राष्ट्रवादी ३.८

इतर ७.३

कोणीच नाही १८.१

माहित नाही १५.६

महाराष्ट्रातील देशाचा मूड आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच देशाच्या नेतृत्वासाठी सर्वोत्म पर्याय मानताना दिसत आहे. त्यांना ५६.६ टक्के पसंती मिळत असतानाच राहुल गांधी १८.७ टक्के तर शरद पवार ९.९ टक्के लोकांच्या पसंतीस पात्र ठरलेत. अर्थात इतर ९.९ आणि उरलेल्या माहित नाही उत्तर देणाऱ्यांची संख्याही उल्लेखनीय आहे.

पंतप्रधानपदासाठी सर्वोत्तम उमेदवार कोण?

नरेंद्र मोदी               ५६.७

राहुल गांधी             १८.७

शरद पवार              ०९.९

इतर                       ०९.९

फक्त नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्येच पसंती विचारली तर नरेंद्र मोदी यांना असलेली पसंती किंचितशी .४ टक्कयांनी कमी होताना आढळली तर राहुल गांधींची मात्र १३ टक्क्यांनी वाढताना दिसतेय. विरोधी पक्षांच्या इतर नेत्यांची पसंतीही त्यांच्याकडे वळत असल्याचा तो फायदा असावा.

नमो की रागा? पंतप्रधानपदासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता?

नरेंद्र मोदी               ५६.३

राहुल गांधी             ३१.१

यापैकी नाही            ०६.९

माहित नाही            ०५.६

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खूप समाधानी किंवा काहीसा समाधानी असणारा वर्ग महाराष्ट्रात ६० टक्के तर त्यांच्या सरकारच्या कारभाराबद्दल समाधानी असणारा वर्ग ७० टक्क्यांच्या आसपास आहेत. विरोधात असूनही यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबतीत मुळीच समाधानी नसणारा वर्ग महाराष्ट्रात मोठा आहे. ४१.३ तुलनेत सत्तेत असूनही असा पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मुळीच समाधानी नसणारा वर्ग २९.२ आहे.  एकप्रकारे उलटी एन्टी इनकम्बसी म्हणावी लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामकाजावर खूप किंवा काही प्रमाणात समाधानी असणाऱ्यांचं प्रमाण ७० टक्के तर सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या आघाडीच्या प्रमुख म्हणून समाधानकारक काम करतात असं फक्त ४८ टक्के मराठी माणसांना वाटते आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारबद्दल किती समाधानी आहात?

माहित नाही                           ०१.५

खूप समाधानी                        २८.८

काही प्रमाणात समाधानी     ३८.३

मुळीच नाही                      ३१.४

(समाधानी असणारा वर्ग ६०% पर्यंत)

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल किती समाधानी

माहित नाही                      ०१.४

खूप समाधानी                   ३७.१

काही प्रमाणात समाधानी     ३२.२

मुळीच नाही                      २९.२

(समाधानी असणारा वर्ग ६०% पर्यंत)

सोनिया गांधींबद्दल किती समाधानी

माहित नाही                      १०.३

खूप समाधानी                   २१.०

काही प्रमाणात समाधानी     २७.४

मुळीच नाही                      ४१.३

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना केली तर राहुल गांधी खूप मागे आहेत. ५० टक्के मराठी माणसं त्यांची काँग्रेस पक्षाध्यक्ष म्हणून कामगिरीबद्दल खूप किंवा काहीसं तरी समाधान व्यक्त करतात. हे मोदींच्या ७० टक्क्यांपेक्षा खूप कमी आहे. मात्र त्यांच्याविषयी मत व्यक्त न करणारा कुंपणावरचा वर्ग २७.३ टक्के आहे. तर मोदींच्या बाबतीत मत व्यक्त न करणारे दीड टक्क्यांपेक्षाही आहेत. कदाचित नरेंद्र मोदींना पदावर चार वर्षे झाली तर राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्ष म्हणून इनिंग आताच सुरु झालीय.

त्याचवेळी देशातील दोन प्रमुख पक्षांच्या अध्यक्षांमध्ये तुलना करायची झाली तर येथे मात्र दोघांच्याही बाबतीत काहीसा सारखाच मूड आहे. मत व्यक्त न करणारे दहा – अकरा टक्क्यांच्या दरम्यान आहेत. तर खूप समाधानी किंवा काहीसा समाधानी असणारा वर्ग हा साठ टक्क्यांच्या आसपास आहे. मुळीच समाधानी नसल्याचेही ३८-३९ टक्के लोकांनी सांगितलंय.

अमित शाह यांची कामगिरी समाधानकारक आहे?

माहित नाही                      १०

खूप समाधानी                    २७.२

काही प्रमाणात समाधानी     २४.६

मुळीच नाही                      ३८.१

राहुल गांधी यांची कामगिरी समाधानकारक आहे?

माहित नाही                      ११.३

खूप समाधानी                   २२.४

काही प्रमाणात समाधानी     २७.३

मुळीच नाही                      ३९.१

राज्यातील भाजपा शिवसेना युती सरकारच्या कारभार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचं जनमत बऱ्यापैकी एकसमान आहे.

महाराष्ट्रातील ६१ ते ६४ टक्के मराठी माणसांना राज्य सरकारचा कारभार खूप किंवा काहीसा समाधानकारक वाटतोय. मात्र, त्याचवेळी मुळीच समाधानी नसणारा ३३ ते ३५ टक्क्यांचा आकडाही काही दुर्लक्ष करण्याजोगा नाही. काहीसं समाधानी असणाऱ्यांचा आकडा सध्या ३२ ते ३५ टक्क्यांपर्यंत आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.

सत्ताधाऱ्यांना तुलनेत चांगला कौल आणि विरोधकांच्याबाबतीत मात्र नाराजीचा देशाचा मूड राज्यातही कायम आहे.  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कामगिरीबद्दल तेरा टक्के काहीच बोलत नाहीत. खूप किंवा काहीसं समाधानी असणारा वर्ग हा ५२ टक्के आहे. तर मुळीच समाधानी नसणारा वर्ग ३४ टक्क्यांवर आहे.  पुन्हा तेच. विरोधकांच्याचबाबतीत जास्त नाराजी.

राज्य सरकारबद्दल किती समाधानी?

माहित नाही                      ०२.५

खूप समाधानी                   २८

काही प्रमाणात समाधानी     ३५.९

मुळीच नाही                      ३३.६

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी किती समाधानी?

माहित नाही                      ०३

खूप समाधानी                   २९.५

काही प्रमाणात समाधानी     ३२.३

मुळीच नाही                      ३५.२

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी किती समाधानी?

माहित नाही                      १३

खूप समाधानी                   १९.९

काही प्रमाणात समाधानी     ३२.६

मुळीच नाही                      ३४.६

देशाचा मूड बिघडलेला असताना...रागावलेला असताना कोणाला बदलू पाहाल असं म्हटल्यावर राज्यातील ४१ टक्के लोकांना काहीच सांगता येत नाही. गावचा सरपंच, महानगराचा महापौर ते मुख्यमंत्री, पंतप्रधान असे पर्याय दिले असता उरलेल्या ५९ टक्क्यांपैकी सर्वात जास्त बदलण्याची इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत दिसतेय. १६ टक्के मराठी माणसांना राज्याच्या नेतृत्वबदल आवश्यक वाटतोय. तर १४ टक्के मराठी मतदारांना नरेंद्र मोदींऐवजी अन्य कुणी पंतप्रधानपदी पाहिजे आहेत. त्याप्रमाणात केंद्र किंवा राज्य सरकारच्याविरोधात देशाचा मूड संतापाचा तसा कमी आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांवर संतापून त्यांना हटवू पाहणाऱ्या मराठी माणसांपैकी किमान अर्ध्या मराठी माणसांना एकंदरीत सरकारला बदलावं असं मात्र वाटत नाही. त्यांचा राग वैयक्तिक जास्त दिसत आहे.

त्याप्रमाणात त्यांचा बदलाचा प्राधान्यक्रमात स्थानिक आमदार, खासदार, महापौर, सरपंच खूप खाली आहेत.

निवडणुकीत मतदान करताना मराठी मतदार कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य देतील त्याचाही ठाव घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाच्या सर्वेक्षणात करण्यात आलाय. मराठी मतदारांच्या मनातील मूड पाहिला तर सर्वात जास्त महत्व म्हणजेच १७.३ टक्के मराठी माणसं देशाच्या सुरक्षेला १७.३ देताना दिसतात. त्यामुळे दहशतवादी हल्लाही ३ टक्क्यांना प्राधान्याचा मुद्दा  वाटणं स्वाभाविकच. मात्र केवळ पाकिस्तानविरोधात रान पेटवून मिशन २०१९ जिंकता येईल असं मानणं हे चुकीचेही ठरु शकेल. कारण भ्रष्टाचार १२.७, बेरोजगारी १९, कुटुंबाचे उत्पन्न ११.८ , महागाई १३.८ असे थेट खुपणारे मुद्दे ६३ टक्के मराठी माणसांना प्राधान्याचे वाटतात.

व्हिडीओ :