चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुनेत्र कडगम (डीएमके) पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचं मंगळवार 7 ऑगस्ट रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र मरीना बीचच्या जागेवरुन तामिळनाडू सरकार आणि द्रमुक समर्थकांमध्ये वाद सुरु असून, तो कोर्टात पोहोचला आहे.


करुणानिधी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आलं आहे. अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह देशभरातील दिग्गज नेते चेन्नईत पोहोचत आहेत.

अंत्यसंस्काराचा वाद हायकोर्टात कशामुळे?

दिग्गज नेते एम करुणानिधी, ज्यांनी दक्षिणेचं महत्त्व जगाला पटवून दिलं, त्यांच्या मृत्यूनंतरही कोर्टाच्या दारात जावं लागलं. समाधीसाठी समर्थकांना हवी असलेली जागा न मिळणं यामागचं कारण आहे. चेन्नईतील मरिना बीचवर जागा देण्यास राज्य सरकारने मनाई केली आहे. त्यामुळे डीएमकेने मद्रास हायकोर्टात धाव घेतली.

करुणानिधींच्या समाधीसाठी तामिळनाडू सरकारने दुसरी जागा सुचवली आहे. पण डीएमके मरिना बीचवर ठाम आहे. सी. राजगोपालचारी आणि के कामराज यांची समाधी असलेली जागा राज्य सरकारने सुचवली आहे. मात्र ही जागा करुणानिधींच्या समर्थकांना मान्य नाही.

दक्षिणेत मरिना बीचचं महत्त्व काय?

चेन्नईतील मरिना बीच हा एक समुद्र किनारा नसून या जागेचं दक्षिणेच्या राजकारणात खास महत्त्व आहे. ही जागा दिग्गज द्रविड राजकारण्यांच्या समाधीसाठी ओळखली जाते. मरिना बीच अशी जागा आहे, जी द्रविडी राजकारणाचा इतिहास सांगते. इथे तीन दिग्गज नेत्यांची समाधी आहे.

द्रविड मुन्नेत्र कडगम (डीएमके) चे संस्थापक सीएम अन्नादुरै यांची समाधी मरिना बीचवर आहे. अन्नादुरै यांच्यानंतर दक्षिणेतील दिग्गज नेते एमजीआर यांनाही मरिना बीचवरच जागा देण्यात आली, तर काही महिन्यांपूर्वीच निधन झालेल्या तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचीही समाधी मरिना बीचवर आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणाला 61 वर्ष देणाऱ्या करुणानिधींच्या समाधीसाठीही मरिना बीचवरच जागा द्यावी, अशी मागणी आहे.

दरम्यान, विशेष म्हणजे द्रविड आंदोलनाचे जनक पेरियार यांची समाधी मरिना बीचवर नाही. पेरियार यांची समाधी चेन्नईतील दुसऱ्या ठिकाणी आहे, ज्याला पेरियार थिडाल म्हणून ओळखलं जातं.