Bengal Panchayat Elections 2023 : पश्चिम बंगालमध्ये आज पुन्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यानंतर आता निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचारा झालेल्या काही जिल्ह्यांमध्ये फेरमतदान पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने हिसांचार झालेल्या भागात पुन्हा मतदान होणार असल्याचं जाहिर केलं. राज्य निवडणुक आयोगाने रविवारी याबाबत माहिती देत पुरुलिया, बीरभूम, जलपाईगुडी आणि दक्षिण 24 परगना येथे फेरमतदान होणार असल्याचं सांगितलं.


बंगालमध्ये आज पुन्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान


बंगाल राज्य निवडणूक आयोगाने पुरुलिया, बीरभूम, जलपाईगुडी आणि दक्षिण 24 परगना येथील मतदान अमान्य असल्याचं सांगत तेथे पुन्हा मतदान होणार असल्याची माहिती दिली. या जिल्ह्यांमधील 697 मतदान केंद्रावर आज, 10 जुलै रोजी, सोमवारी पुन्हा मतदान पार पडणार आहे. शनिवारी या ठिकाणी मतदानादरम्यान हिंसाचार उसळला होता. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला होता. या जिल्ह्यांमध्ये मतदानावेळी हिंसाचार झाला. काही ठिकाणी गोळीबारही झाला, ज्यामध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला.


पंचायत निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले


अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्याच्या त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेअंतर्गत 73,887 जागांवर निवडणुका झाल्या, ज्यासाठी 2.06 लाख उमेदवार रिंगणात होते. दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या. पीटीआयच्या वृत्तानुसार, हिंसाचारातील बळींचा आकडा 15 वर पोहोचला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या बळींबाबत जिल्हा दंडाधिकार्‍यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.


भाजपची निवडणूक आयोगाविरोधात निदर्शनं


पंचायत निवडणुकीतील हिंसाचाराच्या विरोधात रविवारी कोलकाता येथील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर भाजप समर्थकांनी निदर्शनं केली. निवडणूक शांततेत पार पाडण्यात आयोगाच्या दावा फोल ठरल्याच्या विरोधात आक्रमक होत भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. हिंसाचारातील बळींसाठी राज्य निवडणूक आयुक्तांना जबाबदार धरत भाजपने शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.


पंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी हिंसाचार


बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी 6 जुलैला हिंसाचार झाला. काही ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्यात,  काही ठिकाणी बॅलेट बॉक्स पळवण्यात आले. काही ठिकाणी मतदारांना पळवण्यात आलं. या हिंसाचारासाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप डाव्यांनी आणि भाजपने केला आहे. अनेक ठिकाणी बॉम्बफेक, हिंसाचार, गोळीबाराच्या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही ठिकाणी बॅलेट बॉक्सला आगी लावण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.