OP Soni Arrested: पंजाबच्या (Punjab Vigilance Team) दक्षता ब्युरोनं रविवारी माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी (Deputy CM Om Parkash Soni) यांना 2016 ते 2022 या कालावधीत बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपाखाली अटक केली. भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आल्याचं दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, ओपी सोनी यांना सोमवारी (आज) अमृतसर न्यायालयात हजर केलं जाणार आहे. ओपी सोनी तत्कालीन चन्नी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.
दक्षता पथकाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2022 पर्यंत माजी उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न 4,52,18,771 रुपये होतं, तर खर्च 12,48,42,692 रुपये होता. यावेळी त्यांनी सांगितलं की, आरोपी ओपी सोनी यांनी पत्नी सुमन सोनी आणि मुलगा राघव सोनी यांच्या नावे मालमत्ता जमा केली होती.
दक्षता पथकाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, तपासाअंती ओपी सोनी यांच्याविरुद्ध अमृतसर रेंज पोलीस स्टेशन दक्षता ब्युरोमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13 (1) (बी) आणि 13 (2) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दीर्घ काळापासून सुरूये तपास
माजी उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी यांच्याविरोधात अनेक दिवसांपासून चौकशी सुरू होती. 8 नोव्हेंबर रोजी चंदीगडमध्ये बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत ओमप्रकाश सोनी यांनी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात पदाचा गैरवापर करून बेहिशोबी मालमत्ता मिळवल्याचं म्हटलं आहे.
चन्नी सरकारमध्ये मिळाली जबाबदारी
ओमप्रकाश सोनी हे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे कॅबिनेट मंत्री होते. चन्नी सरकारमध्ये असताना त्यांना वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, स्वातंत्र्य सैनिक आणि अन्न प्रक्रिया या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अमृतसर सेंट्रल मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. दरम्यान, ओपी सोनी यांचा जन्म 3 जुलै 1957 रोजी भिल्लोवाल, अमृतसर येथे झाला होता.
ओपी सोनीच नाही तर, चन्नी यांच्यावरही आहेत आरोप
केवळ ओपी सोनीच नाही तर दक्षता ब्युरो पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचीही बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी करत आहे. अलिकडेच दक्षता ब्युरोनं या आठवड्यात चन्नी यांची चौकशी केली होती. मोहालीत या चौकशीपूर्वी दक्षता पथकानं एप्रिल आणि जूनमध्ये दोनदा चन्नी यांची चौकशी केली होती.
चौकशीत चन्नी यांनी सांगितलं होतं की, त्यांच्याकडे फक्त दोन घरं, दोन कार्यालयं आणि एक दुकान आहे. यासंदर्भात त्यांनी ब्युरोला तपशील दिला. भगवंत मान यांच्यावर बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चन्नी यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपाखाली त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि सहकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी दक्षता पथक करत आहे. चन्नी यांनी मात्र कोणत्याही प्रकारची चूक झाल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.