नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट भयानक वेगानं वाढतेय. त्याच पार्श्वभूमीवर काल सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रानं घेतलाय. पण जे गांभीर्य विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात दिसतंय ते नेत्यांच्या परीक्षांबाबत मात्र का दिसत नाही? कारण पश्चिम बंगालमध्ये बेधडक प्रचारसभा अजूनही सुरु आहेत. केंद्रातले अनेक मंत्रीही त्यात व्यस्त दिसतायत. 


कोरोनाचा देशात उद्रेक वाढत चाललाय त्यामुळे सीबीएसईची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाची काळजी करत हा निर्णय घेतला गेलाय. पण ज्या वेगात विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द होतात, त्याच धडाक्यात नेत्यांच्या परीक्षा मात्र अजूनही का रद्द होत नाहीयेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत कोरोनाच्या कुठल्याही नियमांचं पालन न करता सभा सुरु आहेत. देशात दिवसाला 2 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत असताना नेते मात्र अजूनही प्रचारात व्यस्त का आहेत हा प्रश्न आहे.


पश्चिम बंगालची निवडणूक 8 टप्प्यांत होतेय. त्यातले चार टप्पे आता पार पडलेत .अजूनही चार टप्पे म्हणजे निम्मी निवडणूक बाकी आहे. देशात कोरोनाचं संकट वाढलेलं असताना पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सगळे नेते सध्या प्रचारात व्यस्त आहेत. जर देशात कोरोनाची स्थिती बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याइतपत गंभीर वाटते, तर मग हे गांभीर्य नेत्यांच्या आचरणात का दिसत नाहीय?


कोरोनासाठी अनेक राज्यांत नवे नियम लागू होतायत. महाराष्ट्राने 15 दिवसांची संचारबंदी केलीय. दिल्लीत वीकेंड लॉकडाऊनची घोषणा लागू झालीय. त्यामुळे सामान्यांना अनेक गोष्टींत अटकाव आहे. मात्र हाच कोरोना निवडणुकीत मात्र प्रभावहीन होतो की काय? आयोगानं नियम अटींची आठवण करुन दिली तरी कुठल्याच पक्षानं आजवर आपलं सार्वजनिक सभेतलं आचरण आदर्श ठेवलेलं नाहीय.


देशात कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना खरंतर निवडणूक आयोगानं या निवडणुका जाहीर करतानाच काळजी घ्यायला पाहिजे होती. पण राजकीय पक्षांकडून नियम धाब्यावर ठेवले जात असताना आता आयोगानं बंगालबाबत सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. पुढच्या टप्प्यात कोरोनाच्या नियमांचं पालन कसं करता येईल यावर या बैठकीत मंथन होऊन काही निर्बंध येऊ शकतात. 


जी गोष्ट निवडणुकीची तीच कुंभमेळ्याची. कोरोनाचा उद्रेक होत असतानाही हा कुंभमेळा सुरुच आहे. 30 एप्रिलला तिसरं शाहीस्नान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा लवकर संपवण्याची मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या नियमांची यादी केंद्रीय गृहमंत्रालय करत होतं. पण सध्या केंद्रीय गृहमंत्रालय याबाबतीत कुठेच सक्रीय दिसत नाही. जे काही निर्णय होतायत ते राज्यांच्या पातळीवरच होतायत. दिवसाला 2 लाख कोरोना रुग्ण वाढणं हा धोकादायक ट्रेंड आहे. त्यामुळे सरकार तातडीनं अॅक्शनमध्ये येणे गरजेचं आहे.