Weekly Recap : प्रत्येक आठवड्याच्या शेवटी आपण आठवडाभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेत असतो. या चालू आठवड्यात म्हणजे 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट यादरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. या आठवड्यात देशाच्या 77 वा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी पंतप्रधान मोदींनी विविध घोषणा केल्या आहेत. तसेच मी पुन्हा येईनचा नारा दिला आहे. तसेच कॅगचा रिपोर्ट, महागाई नियंत्रणासाठी मोदी सरकार करणार एक लाख कोटींची तरतूद तसेच महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार, मुंबई सिनेट निवडणुका यासह विविध घडामोडींचा घेतलेला आढावा. 


मी पुन्हा येईन... लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास


देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात देशबर साजरा झाला. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या (PM Modi Speech) हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 88 मिनिटे देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच देशातील युवकांना संदेशही दिला. तसेच पुढील वर्षी पुन्हा लाल किल्ल्यावरून भाषण करणार असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. (वाचा सविस्तर)


"गावात 2 कोटी 'लखपती दीदी' बनवण्याचं माझं स्वप्न": PM मोदींनी केली ड्रोन योजनेची घोषणा


स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2023) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना अनेक नवीन योजनांचा उल्लेख करत देशाच्या प्रगतीबद्दल बोलले. त्याचबरोबर काही नव्या योजनांचीही मोदींनी घोषणा केली. यामध्ये शेतीला हायटेक करण्यापासून महिलांना पुढे नेण्यापर्यंतचा समावेश आहे. यावर्षी पंतप्रधान मोदींनी दोन कोटी महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याची घोषणा केली आहे.  (वाचा सविस्तर)


ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचं तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण


ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येतील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारने (Sushil Kumar) दिल्लीच्या तिहार तुरुंगात (Tihar Jail) आत्मसमर्पण (Surrender) केलं आहे. सुशील कुमारने रविवारी (13 ऑगस्ट) रात्री उशिरा तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केलं. त्याच्यावर ज्युनियर अॅथलीट सागर धनखडचा (Sagar Dhankar) खून यासह दंगल आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. सागर धनखडच्या हत्येच्या आरोपाखाली सुशील कुमार 2021 पासून तुरुंगात आहे. (वाचा सविस्तर)


हिमाचलमध्ये भूस्खलन! शिमल्यातील शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृत्यू


हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) राज्यात मोठी दुर्घटना घडली आहे. शिमल्यामध्ये भूस्खलन झाल्याने शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. शिमल्याच्या समरहिल येथील बाळूगंजच्या शिव बावडी मंदिराजवळ दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवमंदिर दरडीखाली गाडलं गेलं. दरडीखाली 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (वाचा सविस्तर)


एक टीम अगोदर गेलीय, दुसरी टीम नंतर जाईल'; दोन पवारांच्या गुप्त भेटीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया


 अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) गुप्त बैठकीनंतर महाविकासआघाडीत अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळालं आहे. पवारांच्या बैठकीनंतर अनेक प्रतिक्रिया येत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक टीम आधी पाठवली दुसरी पण लवकरच जाईल, असे राज ठाकरे म्हणाले आहे.अजित पवार आणि शरद पवारांच्या गुप्त बैठकीनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. (वाचा सविस्तर)



तलाठी परीक्षेत नियोजनाचा अभाव औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीत परीक्षा केंद्र


Talathi Bharti Exam 2023 : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत गट क संवर्गातील 4 हजार 644 तलाठी पदांच्या भरतीसाठीची परीक्षा (Talathi Bharti Exam) तीन टप्प्यात होणार आहे. यासाठी परीक्षार्थीनी निवडलेल्या तीन केंद्र ऐवजी इतरत्र परीक्षा केंद्र दिल्याने तलाठी परीक्षा केंद्र वाटपात गोंधळ झाल्याचे दिसत आहे. औरंगाबाद (Aurangabad) आणि नांदेडच्या (Nanded) विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीचे परीक्षा केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून, केंद्र बदलून देण्याची मागणी होत आहे.  (वाचा सविस्तर)


पावसाची दडी, मराठवाड्याची चिंता वाढली


पावसाने (Rain) दडी मारल्याने मराठवाड्याची (Marathwada) चिंता वाढली आहे. विभागात यावर्षी आजपर्यंत 336 मिमी पाऊस झाला असून, गतवर्षी आजच्या तारखेला 528 मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्यावर्षी आजच्या तारखेत मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणात एकूण 86.67 टक्के पाणीसाठा होता.  (वाचा सविस्तर)


खोके खोके करणाऱ्यांकडे कंटेनर, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला


"चंद्रयान चंद्रावर जाऊन काय उपयोग, तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत, त्यापेक्षा महाराष्ट्र सोडलं असतं तर खर्चही वाचला असता," असा खोचक टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबई-गोवा महामार्ग, तसंच नाशिकमधील रस्त्यांच्या अवस्थेवरुन लगावला आहे. पनवेल इथल्या कोकणातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. (वाचा सविस्तर)


 ISRO च्या चंद्रमोहिमेचा आणखी एक यशस्वी टप्पा! 


भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील (ISRO Moon Mission) आणखी एक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे.  भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चं विक्रम लँडर (Vikram Lander) प्रोप्युलुशन मॉडेलपासून वेगळं झालं आहे. आता इस्रोने ट्वीट करत चांद्रयान-3 संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. (वाचा सविस्तर)


भाज्या, खाद्यतेल, इंधन स्वस्त होणार, मोदी सरकार करणार एक लाख कोटींची तरतूद


सर्वसामान्यांसाी मोठी बातमी आहे. मोदी सरकार लवकरच इंधन आणि खाद्यतेलावरील कर कमी करणार आहे, ज्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी होतील. तसंच, भाज्यांचे दर कमी करण्यासाठी देखील पाऊलं उचलली जाणार आहेत. यासाठी विविध मंत्रालयांच्या बजेटमधून एक लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. (वाचा सविस्तर)


गौरी गणपती आणि दिवाळीत मिळणार 100 रुपयांत आनंदाचा शिधा


दिवाळीप्रमाणेच गौरी गणपती, दिवाळीसाठी  राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार या शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक  लिटर पामतेल देण्यात येणार आहे.  (वाचा सविस्तर)


मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित


मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुकीला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटनाकडून निवडणूक कार्यक्रम  स्थगित झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  (वाचा सविस्तर)


कॅगच्या रिपोर्टमुळे मोदी सरकारच्या योजनांवर प्रश्नचिन्ह?


द्वारका एक्सप्रेसवे (Dwarka Expressway) ते आयुषमान भारत, अयोध्या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ते भारतमाला परियोजना कॅगच्या (CAG) या अहवालांचा हवाला देत काँग्रेसनं (Congress) मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. देशाचे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल अर्थात कॅगचा हा अहवाल नुकताच संसदेच्या (Parliament) पटलावर ठेवण्यात आला आहे. त्याचा आधार घेत काँग्रेसनं मोदींवर सर्वात मोठा हल्लाबोल केलाय. (वाचा सविस्तर)


महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान


मुंबई : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी 25 लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरुपात पुरस्कार प्रदान केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते. (वाचा सविस्तर)


आर एल ज्वेलर्सवर धाड, तब्बल साठ अधिकारी, 45 तास तपासणी


जळगाव : जळगाव शहरातील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर गुरुवारी ईडीने छापेमारी केली. यानंतर जवळपास साठ अधिकाऱ्यांनी 45 तास चौकशीसह तपासणी करून 87 लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने सील केले. यामुळे राजमल लखीचंद ज्वेलर्सला चांगलाच फटका बसला असून ईडीने कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे सोने आणि लाखो रुपयांची रोकड ताब्यात घेतल्याची कारवाई केल्याने खळबळ उडाली.  (वाचा सविस्तर)


नंदू ननावरेंची पत्नीसह आत्महत्या; ठाणे गुन्हे शाखा पोलिसांकडून चार जणांना अटक


उल्हासनगरमध्ये राहत असलेल्या दाम्पत्याने काही राजकीय व्यक्तींना कंटाळून आत्महत्या केली. नंदकुमार ननावरे (Nandkumar Nanavare) आणि उज्जवला ननावरे यांनी 1 ऑगस्ट रोजी गच्चीवरुन उडी मारत आपलं जीवन संपवलं. या आत्महत्येला अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर (Balaji Kinikar) यांचे पीए जबाबदार असल्याचा आरोप आहे. नंदू ननावरे यांचा भाऊ धनंजय ननावरे यांनी योग्य तपास होत नसल्याने बोट कापून घेतलं आहे.  (वाचा सविस्तर)


डिजिटल इंडियाचे आणखी एक पाऊल पडते पुढे; AI आधारित 'Bhashini' प्लॅटफाॅर्मची पीएम मोदींची घोषणा



पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शनिवारी जी 20 डिजिटल इकोनॉमी मंत्र्याच्या बैठकीला संबोधित करताना AI आधारित ‘Bhashini’ प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. भाषिणी हे AI वर आधारित भारताने विकसित केलेले  अनुवाद करणारे प्लॅटफॉर्म आहे. सध्या जगभरामध्ये AI चा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. (वाचा सविस्तर)


टोमॅटो 50 रुपये किलोनं विकण्याची सरकारची घोषणा


स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याचा (Tomato Price Drop) निर्णय घेतला आहे. भाज्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे, विशेषतः महागलेल्या टोमॅटोंच्या किमतींमुळे (Tomato Price) जुलै 2023 मध्ये अन्नधान्य महागाईचा दर 11.51 टक्क्यांवर पोहोचला आहे. यानंतर 15 ऑगस्ट 2023 पासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर सरकारने टोमॅटो (Tomato) 50 रुपये किलोने विकण्याची घोषणा केली आहे. (वाचा सविस्तर)


पहिल्या टी20 सामन्यात पावसाचा खोडा, भारताचा आयर्लंडवर दोन धावांनी विजय


भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात पावसाने खोडा घातला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियंमानुसार लागला. भारतीय संघाने दोन धावांनी सामन्यात बाजी मारली. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात 139 धावांपर्यंत मजल मारली होती. (वाचा सविस्तर)