India This Week: सरत्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. काही दिलासा देणाऱ्या तर काही अंगावर शहारे आणणाऱ्या. काही थरकाप उडवणाऱ्या तर काही आनंद देणाऱ्या. खरंतर सरता आठवडा इतर घडामोडींसोबतच राजकीय घडामोडींना गाजला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यासाठी सविस्तरपणे घेऊन आलोय...
भारताच्या चांद्रयानाचे चंद्राला अलिंगन, दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग
या आठवड्यातील सर्वाधिक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग... भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने मिळवलेलं हे यश लेखण्याजोगे आहे. कारण नासासह अजून कोणत्याच देशाच्या अंतराळ संस्थेला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवता आलेलं नाही.चांद्रयान 2 चं अपयश पचवून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान 3 ची तयारी सुरु केली आणि 40 दिवसांपूर्वी त्याचं यशस्वी प्रक्षेपणही केलं. वेगवेगळे अवघड टप्पे पार करत चांद्रयानाने चंद्रोत्सव साजरा केला. ब्रिक्स बैठकीसाठी विदेश दौऱ्यावर असेलल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेतूनच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांशी संपर्क करुन त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर रात्री त्यांनी इस्रोच्या प्रमुखांशी सविस्तर चर्चा करुन त्याचं आणि संपूर्ण चांद्रयान टीमचं अभिनंदन केलं. (वाचा सविस्तर)
नवी दिल्लीत 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
राजधानी नवी दिल्लीत 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. नेहमीप्रमाणेच याहीवर्षी आपल्या कलावंतानी मराठीचा डंका कायम ठेवला आहे. गोदावरी या मराठी सिनेमाचा दिग्दर्शक निखिल महाजन याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ हा सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपट ठरला. त्यांनी या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन तसंच संगीत दिग्दर्शनही केलंय. द काश्मीर फाईल्ससाठी सहनिर्माती पल्लवी जोशीला उत्कृष्ठ सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. नॉन फीचर फिल्म कॅटेगरीत ‘रेखा’ या मराठी सिनेमाला स्पेशल ज्युरी अवार्ड जाहीर झाला. तसंच चंद्रकांत कुलकर्णी निर्मित आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित ‘चंद सांसे’ या हिंदी सिनेमाला कौटुंबीक मूल्ये जपणारा सर्वोत्कृष्ठ सिनेमा म्हणून पुरस्कार मिळाला. चंद्रकांत कुलकर्णी हे आघाडीचे मराठी नाटक तसंच सिनेमा दिग्दर्शक आहेत. हिंदीतील लोकप्रिय सिनेमांनाही वेगवेगळ्या कॅटेगरीत पुरस्कार मिळाले आहेत. (वाचा सविस्तर)
उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या 48 मतदारसंघाचा आढावा
राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केलीय. देशपातळीवर विरोधकांची इंडिया आघाडी हा त्याचाच भाग, इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक या आठवड्यात होत आहे. तिकडे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षकार्यकर्त्यांसोबत राज्यातील सर्व 48 मतदारसंघाचा आढावा घेणं सुरु केलंय. शिवसेनेने आजवर कधीच सर्व 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवलेली नाही. ते आजवर भाजपसोबत निवडणुका लढवत आले आहेत. मात्र आता उद्धव ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीचा भाग आहे. एकूणच काय तर निवडणुकीचे वारे सुरु झाले आहेत. त्यातच वेगवेगळी सर्वेक्षणे आणि जनमताचे कौल यातून लोकांना काय वाटतं याचा कानोसा घेण्याचे प्रयत्न सुरु झालेत. (वाचा सविस्तर)
अजितदादा नेमके कुणाचे? शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या यू टर्नमुळे सगळेच संभ्रमात
राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं बंड ताजं असलं तरी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची भूमिका काय याविषयीचा संभ्रम कायम आहे, कदाचित शरद पवारांना हा संभ्रम कायम राहावा असंच वाटत असावं. शुक्रवारी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अजित पवार हे राष्ट्रवादीचेच नेते आहेत आणि पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. एक दिवस अगोदर सुप्रिया सुळे यांनीही हीच भूमिका मांडली होती. नंतर शरद पवारांनी स्पष्टीकरण देत असं वक्तव्य केलंच नसल्याचंही सांगितलं. त्यावर कडी करत शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर, लवकरच शरद पवार आणि सुप्रिया सुळेही भाजप सरकारला पाठिंबा देतील असा दावा केला. (वाचा सविस्तर)
जळगाव येथील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची छापेमारी
जळगावमधील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडी छापे पडले. त्याची राजकीय चर्चाच खूप झाली. कारण राजमल लखीचंद या सोन्याच्या पेढीचे मनीष जैन हे राष्ट्रवादीचे अनेक वर्षे खजिनदार राहिले आहेत. ते विधान परिषद आमदारही होते. या आठवड्यात आरएलवरील छापे हा फक्त जळगावमधील नाही तर राष्ट्रीय पातळीवरील विषय बनला होता. (वाचा सविस्तर)
पहिल्या सत्रात सर्व्हर डाऊन, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित; गोंधळामध्ये तलाठी भरती परीक्षा पार
राज्य शासनाच्या वतीनं तलाठी भरतीसाठी घेण्यात येत असलेल्या ऑनलाईन परीक्षेत आज सर्व्हर डाऊन झाल्यानं ठिकठिकाणी गोंधळ उडाला. ऐनवेळी सर्व्हर डाऊन झाल्यानं पहिल्या सत्राची परीक्षा तब्बल दीड तासानं उशिरानं सुरु करण्यात आली. त्यामुळं दुसऱ्या सत्राची ऑनलाईन परीक्षाही लांबणीवर पडली होती (वाचा सविस्तर)
कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्याने याचा मोठा फटका कांदा निर्यातदारांना (Onion Export) बसला आहे. कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क (Onion Export Duty) आकारल्याच्या मुद्यावरुन वातावरण चांगलचं तापलं. सरकारच्या या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, काल (23 ऑगस्ट) केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यापाऱ्यांसह शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर लिलाव सुरू झाले (वाचा सविस्तर)
बुद्धिबळ विश्वचषकात प्रज्ञानंद हरला, मनं मात्र जिंकली
बुद्धिबळ विश्वचषकात भारताच्या प्रज्ञानंदने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला कडवी झुंज दिलीय.. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकलाय... भारताच्या आर. प्रज्ञानानंद याला टायब्रेकर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्या होत्या, त्यामुळे आज टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला. यामध्ये कार्लसन याने बाजी मारली. कार्लसन याला प्रज्ञानानंद यांनी कडवी टक्कर दिली (वाचा सविस्तर)