Heatwave in India: देशातील (India) अनेक राज्यांमध्ये सध्या उष्माघातामुळे (Heatwave) अनेकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात देखील उष्णतेमुळे नागरिक हैराण झाल्याचं चित्र आहे. देशात मान्सून दाखल झाला असूनही जून महिना अर्धा सरला तरी मान्सूनचा पत्ता नाही. त्यामुळे देशभरात उष्णेतेचे प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अनेकांनी घरात राहणचं पसंत केल्याचं चित्र आहे. 


उत्तर प्रदेशांत उष्माघाताचे बळी


उत्तर प्रदेशासह संपूर्ण उत्तर भारतात उष्णतेने कहर केला आहे. वाढत्या तापमानामुळे लोकं त्रस्त झाली आहे. यामुळे उष्माघाताचा त्रास झाल्याने रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र सध्या उत्तर प्रदेशात आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात 9 दिवसांत 128 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लखनऊमध्ये गेल्या चोवीस तासांत 178 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या 178 जणांपैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. वाराणसीत देखील उष्माघातामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांचे पथक सध्या उत्तर प्रदेशात पोहचले आहे. तसेच राज्यात सरकारकडून देखील रुग्णालयात रुग्णांची व्यवस्था करण्यात येत आहे. पोलीस दल देखील या उष्णतेच्या लाटेमुळे हैराण झाले असून अनेकांना कर्तव्य बजावत असताना त्रास झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


बिहार आणि ओडिशा राज्यात उष्माघाताचा कहर


बिहार आणि ओडिशा राज्यात देखील उष्माघातामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. बिहारमध्ये उष्माघातामुळे 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात 18 जून रोजी सर्वाधिक 48 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर ओडिशा राज्यात देखील उष्माघातामुळे नागरिक हैराण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.


महाराष्ट्रात देखील उष्णतेमुळे नागरीक हैराण


राज्यात कोकणात मान्सून दाखल असून अजूनही तो इतर जिल्ह्यांमध्ये सक्रिय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. 


झारखंड, छत्तीसगढ या रांज्यामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे झारखंड जिल्ह्यातील शांळांच्या सुट्ट्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. झारखंड राज्यात 21 जून पर्यंत शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. आंध्रप्रदेशातही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा लागून राहिली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Heatwave In Bihar : बिहारमध्ये उष्णतेमुळे 24 तासात 35 जणांचा मृत्यू, तर 200 जण रूग्णालयात दाखल


Heatstroke: जास्त पाणी पिऊन फायदा नाही; उष्माघात टाळायचा असेल तर कराव्या लागतील 'या' गोष्टी!