iPhone Export : अॅपलने मे महिन्यात भारतातून आयफोनच्या (iPhone) निर्यातीचा नवा विक्रम केला आहे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) च्या अहवालानुसार, मे महिन्यात भारतातून 10,000 कोटी रुपयांच्या आयफोनची निर्यात झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 (FY23) मध्ये, भारताने 5 अब्ज डॉलर म्हणजेच 40,951 कोटी रुपयांचे iPhones निर्यात केले. ICEA च्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात भारतातून एकूण स्मार्टफोनची निर्यात 12,000 कोटी रुपयांची होती, ज्यापैकी 80 टक्के आयफोन होते.इतकंच नाही तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत भारतातून 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त (2.4 बिलियन डॉलर) किमतीच्या आयफोनची निर्यात झाली आहे. तर गेल्या वर्षी म्हणजे आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत भारताने 9,066 कोटी रुपयांचे अॅपल फोन निर्यात केले होते.


Apple इंडियाने स्थानिक मॅन्युफॅक्चरिंगवर जास्त भर दिला आहे. सध्या अॅपलकडून भारतात एकूण 5 ते 7 टक्के आयफोनची निर्मिती केली जाते. 2025 पर्यंत एकूण उत्पादनापैकी 25 टक्के निर्मिती भारतातून करण्याचा कंपनीचा मानस आहे.  


दरम्यान, अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावामुळे अॅपलने व्यावसायिक सोईसाठी भारतावर लक्ष केंद्रीत केलं आहे. सध्या भारत इटली, युके, इटली, मध्य पूर्व, रशिया, जपान आणि जर्मनीसह बऱ्याच विकसनशील देशांना iPhone निर्यात करतो. कंपनीने पहिल्यांदा जानेवारी 2016 मध्ये भारतात अॅपल स्टोअर सुरु करण्यासाठी भारत सरकारकडे एक निवदेन सादर केलं होतं. यावर्षीच भारत सरकारने मल्टिनॅशनल कॉर्पोरेशनसाठी (MNCs) गुंतवणुकीच्या नियमात शिथिलता आणली होती. यानंतर Apple आणि IKEA यासारख्या मोठ्या कंपन्यांचा भारतात आपलं स्टोअर सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला. 


भारतात 25 टक्के iPhone ची होणार निर्मिती 


अॅपलने भारतामध्ये सप्टेंबर 2020 मध्ये आपलं पहिलं ऑनलाईल स्टोअर लाँच केलं होतं. अलिकडेच कंपनीने आपले दोन अधिकृत स्टोर मुंबई आणि दिल्ली शहरात सुरु केले आहेत. या स्टोरची सुरुवात केल्यानंतर कंपनीने एक महिन्यात 50 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. सध्या कंपनीकडून भारतात एकूण आयफोनपैकी फक्त 5 ते 7 टक्के आयफोनची निर्मिती केली जाते. जेपी मॉर्गन या अमेरिकन आर्थिक सेवा पुरवणाऱ्या मल्टिनॅशनल कंपनीनुसार, 2025 पर्यंत एकूण उत्पादनापैकी 25 टक्के निर्मिती भारतातून करण्याचा कंपनीचा मानस आहे.  


लवकरच iPhone 15 लाँच होणार 


अॅपल कंपनी सप्टेंबरमध्ये iPhone 15 सीरिज लाँच करण्याची शक्यता आहे. या सीरिजच्या आयफोनमध्ये यूएसबी टाईप-सी चार्ज देणार आहे. यासोबत बेस मॉडलमध्ये 48 मेगापिक्सेल कॅमेराही उपलब्ध करुन देऊ शकते. आतापर्यंच्या बेस मॉडलमध्ये फक्त 12  मेगापिक्सेलचाच कॅमेरा देण्यात येत होता. लीक केलेल्या माहितीनुसार, iPhone 15 प्रो मॅक्समध्ये एक प्रॉमिनंट कॅमेरा मॉड्यूल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या कॅमेऱ्यात सेंसर आणि 5-6x ऑप्टिकल झूम पेरिस्कोप लेन्सही असणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा :


iPhone 15 series: आयफोन 15ची प्रतीक्षा लवकरच संपणार, आयफोन 15च्या सीरिजमध्ये फास्ट चार्जिंग फिचर मिळणार?