Weather Update Today : नवीन वर्षात देशात बहुतेक सर्व ठिकाणी तापमानात मोठी घट (Temperature Drops) झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील हवामानात बदल (Weather Update) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर (Fogg) पसरल्याचं चित्र दिसत आहे. पहाटेच्या वेळी धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हवामान खात्याकडून देशात आज काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह राजस्थानमध्ये पावसाचा अंदाज आहे.
पुढील 48 तासांत पावसाची शक्यता
2 जानेवारी रोजी दक्षिण उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 3 जानेवारीलाही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मंगळवारी पावसाची शक्यता असून बुधवारी पावसाची जोर वाढू शकतो. पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये उत्तर प्रदेशच्या काही भागात आणि उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही ठिकाणी दाट ते दाट धुके पडण्याची शक्यता आहे. पुढील 48 तास देशात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसाती रात्रीच्या तापमानात आणखी घट होऊ शकते. तर दिवसा तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मध्य भारताचा काही भाग आणि मैदानी भाग, विशेषत: मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा उत्तरी भाग, उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग तसेच हरियाणा आणि राजस्थानच्या आसपासच्या भागात थंडी वाढू शकते. त्याचप्रमाणे लक्षद्वीप परिसरात पावसाचा अंदाज असल्यामुळे या ठिकाणी मच्छिमारांनी समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
महाराष्ट्रासह 'या' राज्यांत पावसाची शक्यता
IMD च्या माहितीनुसार, 5 ते 11 जानेवारी दरम्यान रात्रीच्या तापमानात घट झाल्याने मध्य भारतातील काही भागात थंडीची लाट येऊ शकते. पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आयएमडीने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जानेवारी महिन्यात लडाखमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारतातील मैदानी भागांवर दाट धुके कायम असल्याने, पुढील दोन दिवसांत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तर राजस्थानच्या काही भागांमध्ये कडाक्याची थंडी कायम राहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने (IMD) म्हटलं आहे.