मुंबई : मणिपूरच्या (Manipur Violence) थौबल जिल्ह्यात सोमवार 1 जानेवारी रोजी संध्याकाळी तीन जणांचा गोळ्या झाडून मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले आहेत.  त्यानंतर राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ला करणाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. काही लोक  लिलॉन्ग चिंगजाओ भागात आले आणि त्यांनी स्थानिक लोकांवर गोळीबार केला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 


मणिपूरच्या या पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी 


हल्ल्यानंतर संतप्त जमावाने तीन चारचाकी गाड्या पेटवून दिल्या. या गाड्या कोणाच्या आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. या हिंसाचारानंतर  थौबल, इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, कक्चिंग आणि बिष्णुपूर या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी काय म्हटलं?


मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या हिंसाचाराचा पूर्णपणे निषेध केलाय. तसेच त्यांनी लिलाँगमधील रहिवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सध्या गुन्हेगारांना पकडण्याचे काम सध्या पोलीस करत असल्याची माहिती म्हटलं आहे. तसेच लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  


3 मे पासून आतापर्यंत 180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला


मणिपूरमध्ये 3 मे 2023 रोजी जातीय हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून, 180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तसेच शेकडो लोक जखमी झालेत.  बहुसंख्य मेईतेई समुदायाच्या मागणीला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या निषेधार्थ मणिपूरमध्ये 3 मे 2023 रोजी 'आदिवासी एकता मार्च' काढण्यात आला तेव्हा हिंसाचार झाला.मणिपूरच्या लोकसंख्येच्या 53 टक्के लोकसंख्या मेईतेई आहे आणि ते बहुतेक इम्फाळ खोऱ्यात राहतात. आदिवासी- नागा आणि कुकी 40 टक्क्यांहून थोडे जास्त आहेत आणि ते डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.






हेही वाचा : 


Shree Jagannath Temple: स्कर्ट, स्लिवलेस टॉप, जीन्स घालून करता येणार नाही जगन्नाथाचे दर्शन, पुरीच्या मंदिरात ड्रेस कोड लागू,काय आहेत नियम आणि अटी?