Weather Update Today : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात (Cyclone Michaung) रुपांतर झालं आहे. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि ओडिशा (Odisha) किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे. दरम्यान चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टी भागात दिसून येईल तामिळनाडू, चेन्नई आणि पुदुच्चेरीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी रात्रीपासूनच या भागात अति मुसळधार पाऊस सुरु आहे. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. 


किनारी भागात हवामान विभागाचा अलर्ट


तामिळनाडू, चेन्नई आणि ओडिसा किनारी भागातील नागरिकांना आणि मच्छीमारांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. चेन्नईमध्ये आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्येही शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चेन्नईमध्ये ताशी 13 किमी वेगाने वारे वाहत आहेत. चक्रीवादळामुळे येत्या काही तासांता वाऱ्यांचा वेग वाढणार असून 75 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.


मिचॉन्ग चक्रीवादळाचा धोका


दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळ मिचॉन्ग गेल्या सहा तासांमध्ये 13 किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकलं आहे. 3 डिसेंबरला रात्री 11.30 वाजता चक्रीवादळ अक्षांश 12.8°N आणि रेखांश 81.6°E जवळ केंद्रीत झालं होतं. हे क्षेत्र पुद्दुचेरीपासून सुमारे 210 किमी पूर्व-ईशान्य, चेन्नईच्या 150 किमी पूर्व-आग्नेय, नेल्लोरच्या 250 किमी आग्नेय, बापटलापासून 360 किमी दक्षिण-दक्षिणपूर्व आणि मछलीपट्टनमच्या 380 किमी दक्षिण-पूर्वेस आहे.


5 डिसेंबरला धडकणार चक्रीवादळ


आज चक्रीवादळ आणखी तीव्र होऊन दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनार्‍यापासून पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 4 डिसेंबरला दुपारपर्यंत मिचॉन्ग चक्रीवादळ उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर, ते उत्तरेकडे जवळजवळ समांतर आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनार्‍याजवळ सरकेल, असा अंदाज आहे. 5 डिसेंबर दरम्यान चक्रीवादळ अधिक तीव्र होऊन किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. मंगळवारी चक्रीवादळ नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. यावेळी 90-100 किमी ते 110 किमीपर्यंत प्रतितास वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.






आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर लँडफॉल


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मिचॉन्ग चक्रीवादळ 5 डिसेंबरच्या दुपारपर्यंत ताशी 80-90 किमी प्रति तास ते 100 किमी प्रति तास या वेगाने दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकेल. मंगळवारी सकाळी नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान 100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. चक्रीवादळ मंगळवारी दुपारी नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडेल. आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर चक्रीवादळाचा लँडफॉल होण्याचा अंदाज आहे.