Bharat Jodo Nyay Yatra: नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) रविवारी (14 जानेवारी) 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyaya Yatra) सुरू करणार आहेत. हा प्रवास मणिपूरच्या (Manipur) थौबल जिल्ह्यातून (Thoubal District) सुरू होऊन मुंबईला (Mumbai News) पोहोचेल. या काळात राहुल गांधी 6 हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत. हा प्रवास तब्बल दोन महिने चालणार आहे.


राहुल गांधी 60 ते 70 जणांसह पायी आणि काही ठिकाणी बसनं प्रवास करतील. दुपारी 12 वाजता मणिपूरमधील खोंगजोम वॉर मेमोरियल येथून हा प्रवास सुरू होईल. दरम्यान, यापूर्वी मणिपूरची राजधानी इंफाळपासून (Imphal) सुरुवात होणार होती.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' रविवारपासून (14 जानेवारी) सुरू होत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा इम्फाळपासून सुरू होऊन 20 मार्चला मुंबईत संपणार आहे. हा प्रवास थौबल जिल्ह्यातील खंगजोम येथून सुरू होईल. 66 दिवस चालणारी ही भारत जोडो न्याय यात्रा देशातील 15 राज्यांमधून जाणार आहे. यादरम्यान राहुल गांधी ठिकठिकाणी थांबून स्थानिक लोकांशी संवाद साधतील आणि जाहीर सभांना संबोधित करतील. 67व्या दिवशी यात्रेच्या समारोपाच्या वेळी राहुल पत्रकार परिषदेला संबोधित करू शकतात.




खंगजोम वॉर मेमोरियल हे एक ऐतिहासिक स्मारक आहे, ज्याचं उद्घाटन 2016 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांनी काँग्रेस सरकारच्या काळात केलं होतं. 1891 मध्ये झालेल्या शेवटच्या अँग्लो-मणिपूर युद्धातील शहीदांच्या स्मरणार्थ हे ऐतिहासिक स्मारक बांधलं गेलं आहे.


काँग्रेसनं दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी रविवारी सकाळी 11 वाजता इंफाळला पोहोचतील आणि खोंगजोम वॉर मेमोरियलला भेट देतील. यानंतर प्रवासापूर्वी थोबलमध्ये बैठक होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या या दुसऱ्या यात्रेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हिरवा झेंडा दाखवतील. या भेटीत इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) अनेक नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व विरोधी पक्षांच्या अध्यक्षांना यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण पाठवलं आहे. याशिवाय इतरही अनेक सेलिब्रिटी या प्रवासात सहभागी होणार आहेत.


भारत जोडो न्याय यात्रेत 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांचा समावेश 


राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा देशातील 15 राज्यांमधून जाणार आहे. या यात्रेत 110 जिल्हे, 100 लोकसभेच्या जागा आणि 337 विधानसभा जागांचा समावेश असेल. या कालावधीत हा प्रवास 6713 किलोमीटरचा प्रवास करेल. ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात मार्गे महाराष्ट्रातील मुंबईत पोहोचेल. प्रवास इथेच संपेल. 


यात्रेचा हा प्रवास जनतेला न्याय मिळावा यासाठी : जयराम रमेश


यात्रेच्या एक दिवस आधी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, ही यात्रा म्हणजे ध्रुवीकरणाचं राजकारण आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अन्यायाविरुद्ध काँग्रेसनं सुरू केलेला वैचारिक लढा आहे. हा निवडणूक प्रवास नसून राजकीय पक्षाचा वैचारिक प्रवास आहे. द्वेष आणि हिंसेच्या राजकारणाविरोधात देशभरात प्रेम आणि एकोपा मागण्यासाठी भारत जोडो यात्रा होती. देशातील जनतेला न्याय मिळावा या मागणीसाठी आता न्याय यात्रा आहे.