मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये (Kashmir) सध्या प्रचंड थंडी आहे. पण तरीही जानेवारी महिन्यातही बर्फवृष्टीची (Snowfall) शक्यता कमी असल्याने लडाख प्रदेशात दुष्काळाची शक्यता वर्तवली जातेय.  काश्मीर हवामान विभागाचे संचालक डॉ मुख्तार अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जानेवारीपर्यंत या भागात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता फारच कमी आहे. तसेच  दोन कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्स येतील, परंतु ते उंच पर्वतांवर फक्त थोडे हिमवर्षाव आणतील. म्हणजेच या महिन्यात काश्मीर खोऱ्यात किंवा लडाखमध्ये बर्फवृष्टी होणार नाही.


शनिवार 13 जानेवारी रोजी सकाळी काश्मीरच्या गुरेझ खोऱ्यातील तुलईल भागात काही प्रमाणात बर्फवृष्टी झाली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या भागात फक्त एक इंचपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाली आहे. साधारणपणे जानेवारी महिन्यात साधारणपणे 10 ते 20 फूट बर्फवृष्टी होते. परंतु यंदाच्या महिन्यात तशी परिस्थिती नाही. त्यामुळे काश्मीरमधील ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. 


नदीच्या प्रवाहात घट


यंदाच्या संपूर्ण काश्मीर  खोऱ्यात कमी हिमवृष्टी झाल्यामुळे, स्थानिक लोकांना शेती, बागायती आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झालीये. त्यातच पाण्याच्या प्रवाहात होणारी घट, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीर आणि लडाखला 100 टक्के वीजपुरवठा करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.


जानेवारीत बर्फवृष्टी होणार नाही - हवामान विभाग


जानेवारी अखेरपर्यंत जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पाऊस किंवा बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला नाही. येथे कमाल तापमान 13-15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे, जे सामान्यपेक्षा 10-12 अंश जास्त आहे. काश्मीर खोऱ्यात अजूनही पाणीपुरवठा पुन्हा भरण्यासाठी येत्या दोन महिन्यांत थोडा पाऊस आणि बर्फवृष्टीची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे, बर्फवृष्टी नसल्यामुळे, झोजिला पासवर बर्फ नसल्यामुळे लडाखशी श्रीनगर-कारगिलकडे जाणारा रस्ता खुला आहे. साधारणपणे डिसेंबरपासून 4 ते 5 महिने बर्फवृष्टीमुळे हा रस्ता बंद राहतो. 


बर्फवृष्टी नसल्याने रस्ते मोकळे आहेत


जानेवारीत या प्रदेशात उणे 30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यामुळे, फळे आणि भाजीपाला खूप घट्ट झाला, त्यामुळे त्यांची साठवणूक आणि विक्री करणे कठीण झाले. कमी बर्फवृष्टीमुळे रस्ते मोकळे झाल्यामुळे लडाखचे लोक आनंदी आहेत. त्याचवेळी अपेक्षेपेक्षा जास्त तापमानामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान होण्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत.


काश्मीर हवामान विभागाचे संचालक म्हणाले, “येथील हवामानातील बदलामुळे फळझाडे लवकर फुलू शकतात. याचा उत्पादनावर गंभीर परिणाम होईल कारण अजूनही हिवाळा आहे, त्यामुळे तापमानात कधीही अचानक घट होऊ शकते.


हेही वाचा : 


भारतीय लोकांच्या उत्पन्नात होतेय झपाट्यानं वाढ, 10 कोटी लोकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांच्या पुढे जाणार