Weather In India : राजधानी अद्यापही तापलेलीच, 15 जूनपर्यंत देशातील 'या' भागात उष्णतेची लाट कायम राहणार
देशात काही ठिकाणी पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे काही ठिकाणी अद्यापही उष्णतेची लाट असल्याचे दिसत आहे.
![Weather In India : राजधानी अद्यापही तापलेलीच, 15 जूनपर्यंत देशातील 'या' भागात उष्णतेची लाट कायम राहणार weather in india maximum temperature in delhi is 43.8 degrees will burn till 15 june Weather In India : राजधानी अद्यापही तापलेलीच, 15 जूनपर्यंत देशातील 'या' भागात उष्णतेची लाट कायम राहणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/12/9461ae3c4209f609fb988b12c74e1a1f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Heat Waves And Monsoon In India : देशात मान्सूनचं आगमन झालं आहे. देशात काही ठिकाणी पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे काही ठिकाणी अद्यापही उष्णतेची लाट असल्याचे दिसत आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या काही भागात 15 जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सध्या देशाची राजधानी दिल्लीत तापमानाचा पारा हा 43.8 अंश सेल्सिअसवर आहे. 15 जूनपर्यंत उष्णतेपासून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळणार नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
हवामान विभागानं सांगितलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत दिल्लीत गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ आकाश राहणार आहे. तर काही ठिकाणी पाववसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, 15 जूनपर्यंत उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. 16 जून ते 22 जून दरम्यान कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी किंवा सामान्यच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. 16 जून ते 22 जून दरम्यान देशातील कोणत्याही भागात उष्णतेची लाट अपेक्षित नसल्याचे हवामान विभागानं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात मान्सून दाखल
शुक्रवारी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळकोकणात मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतही काल मान्सून दाखल झाला आहे. पुढच्या चार ते पाच दिवसात राज्याच्या अन्य भागात देखील मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी विजेचं खांब देखील कोसळले आहे. दम्यान, पुढील पाच दिवसात राज्याच्या विविध भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढच्या 24 तासात कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
पुढच्या 24 तासात दक्षिण कोकणसह गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे, तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं सांगितला. तसेच विदर्भातही काही ठिकाणी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)