नवी दिल्ली : आणीबाणीसारख्या काळ्या युगाने लोकशाहीवर काय परिणाम केला, याचा समावेश पाठ्यपुस्तकात करण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली. भविष्यातील पिढीला याविषयी माहिती व्हावी हा उद्देश असल्याचं ते म्हणाले.


सध्या पाठ्यपुस्तकात पुस्तकांमध्ये आणीबाणीबाबत माहिती, तसेच संदर्भ आहेत, मात्र आणीबाणीसारख्या काळ्या युगाने लोकशाहीवर कशा प्रकारे परिणाम केला याचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल, येणाऱ्या पिढ्यांना आणीबाणीच्या काळ्या युगाबाबत माहिती असण्याची गरज आहे आणि हाच या निर्णयामागचा उद्देश असल्याचं जावडेकर म्हणाले.


माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 च्या मध्यरात्री देशात आणीबाणी लागू केली, जी 21 मार्च 1977 पर्यंत सुरु होती. या काळात अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, तर माध्यमांचा आवाजही दाबण्यात आला.

नागरिकांच्या हक्कांवरही या काळात गदा आणण्यात आली होती. 1975 साली जाहीर करण्यात आलेली आणीबाणी ही देशात तिसऱ्यांदा लावण्यात आलेली आणीबाणी होती. सर्वात पहिल्यांदा 1962 मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी ती लावण्यात आली. तर 1971 मध्ये भारत-पाक युद्धाच्या वेळी ती दुसऱ्यांदा लावण्यात आली. मात्र 1975 साली देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याच्या कारणावरून तिसऱ्यांदा आणीबाणी जाहीर करण्यात आली. अशा कारणावरुन 1975 साली जाहीर करण्यात आलेली पहिली आणि शेवटची आणीबाणी ठरली.

जेटलींकडून इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना

देशात 43 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या काळात माध्यमांचा आवाज दाबला गेला, विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. आणीबाणीत तुरुंगवास भोगलेले सध्याचे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी त्या स्थितीची आठवण काढत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा क्रूर हुकूमशाह हिटलरसोबत केली आहे.

अरुण जेटली यांनी सोमवारी फेसबुक पोस्ट लिहून इंदिरा गांधींची हिटलरसोबत तुलना केली. सर्वसामान्यांसाठी असलेल्या संविधानाचं रुपांतर हुकूमशाहीमध्ये करण्यात आलं. संसदेतील विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि आपल्या अल्पमतातील सरकारला दोन तृतीयांश बहुमत असल्याचा दावा करण्यात आला, असं जेटलींनी म्हटलं आहे.