भारत : खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत (India) आणि कॅनडामध्ये (Canada) सध्या वादाची ठिगणी पडली आहे. याच पार्श्वभूमीवर राजनयिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून गुरुवारी (21 सप्टेंबर) रोजी उत्तर देण्यात आले आहे. भारतातील कॅनडाच्या राजनयिक अधिकाऱ्यांना मिळालेल्या धमक्यांवर भाष्य करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं की, 'आम्ही परदेशातील प्रत्येक राजनयिकाचे संरक्षण करत आहोत, आम्ही कधीच आमच्या जबाबदाऱ्यांपासून दूर जात नाही. '
पुढे बोलताना बागची यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही आमच्या जबाबदाऱ्या खूप गांभीर्याने निभावतो. भारतातील परदेशी राजनयिक अधिकाऱ्यांची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही त्यांना योग्य ती सुरक्षा नक्की देऊ. तर कॅनडाही आमच्या राजनयिक अधिकाऱ्यांबाबत अशीच संवेदनशीलता दाखवेल, अशी आमची अपेक्षा आहे.' तर कॅनडियन लोकांना सध्या भारतीय व्हिसा मिळणार नसल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
भारताने काय म्हटलं?
'कॅनडामध्ये जितकी भारतीय राजनयिकांची संख्या आहे, त्यापेक्षा जास्त कॅनडीयन राजनयिक हे भारतात आहेत. अशावेळी दोन्ही देशातील राजनयिकांची संख्या समान असायला हवी. आम्हाला आशा आहे की, कॅनडा त्यांच्या देशातील दहशतवाद आणि भारतविरोधी कारवायांबद्दल कठोर पावलं नक्की उचलेल,' असं बागची यांनी म्हटलं.
हरदीप सिंह निज्जर हत्याकांडावर बागची यांनी काय म्हटलं?
'कॅनडामधून भारतविरोधी कारवाया केल्या जात असल्याची गुप्त माहिती आम्ही कॅनडाला दिली होती. हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाने भारताला तपशीलवार माहिती दिलेली नाही. त्यामुळे होत असलेले सगळे आरोप हे राजकिय हेतूमुळे केले जात आहे,' असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंमदर बागची यांनी म्हटलं आहे. दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी नुकताच हरदीप सिंह निज्जर हत्या प्रकरणात भारताचा हात असण्याची शक्यता असल्याचा दावा केला होता. तर भारतीय आणि कॅनडामध्ये सध्या तणावाचे वातावरण असून कॅनडीयन व्हिसावर देखील भारताकडून बंदी घालण्यात आली आहे.