नवी दिल्ली : दहशतवाद्याच्या हत्येनंतर भारतावर बेछुट आरोप करणाऱ्या कॅनडाला भारत सरकारने तगडा झटका दिला आहे. भारताने कॅनडातील (diplomatic standoff) व्हिसा सेवा बंद केली आहे. कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या व्हिसा सुविधा वेबसाईटवर घोषणा करण्यात आली आहे. कॅनडाकडून करण्यात आलेल्या बेछुट आरोपांवर भारताकडून झटक्यावर झटका सुरु आहे. कॅनडा पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांनंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. कॅनडाने एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्यानंतर भारताने मंगळवारी जशास तसे उत्तर देत एका वरिष्ठ कॅनडा राजनैतिक हकालपट्टी केली होती. 






कॅनडातील भारतीयांना काळजी घेण्याचे आवाहन 


परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) म्हटले की, "कॅनडामधील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या निषेध केलेले द्वेषपूर्ण गुन्हे, गुन्हेगारी हिंसाचार पाहता, तेथील सर्व भारतीय नागरिकांनी आणि प्रवासाचा विचार करणार्‍यांना जास्तीत जास्त काळजी घ्यावी." तसेच "अलीकडील काळात विशेषतः भारतीय राजनैतिक अधिकारी आणि भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणार्‍या भारतीय समुदायाच्या वर्गांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना अशा घटना पाहिल्या गेलेल्या कॅनडातील प्रदेश आणि संभाव्य ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 


कॅनडामधील ढासळत चाललेलं सुरक्षा वातावरण लक्षात घेता, विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. MEA ने म्हटले आहे की, कॅनडातील भारतीय समुदायाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी भारतीय उच्चायुक्त आणि महावाणिज्य दूतावास कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतील.


कॅनडातील भारतीय नागरिक आणि भारतातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित वेबसाइट किंवा MADAD पोर्टल madad.gov.in माध्यमातून ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयात किंवा टोरंटो आणि व्हँकुव्हर येथील भारतीय महावाणिज्य दूतावासात नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीमुळे उच्चायुक्तालय आणि महावाणिज्य दूतावास कोणत्याही आणीबाणीवेळी कॅनडामधील भारतीय नागरिकांशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधू शकतील,” असेही म्हटले आहे.


कॅनडावर निष्क्रियतेचा आरोप


खलिस्तान समर्थकांविरुद्ध भारताने कॅनडावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे, ज्याला ट्रूडो सरकारचा कॅनडाच्या-शीख समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जाते. भारताला असे वाटते की, यामुळे खलिस्तान समर्थक गटांना भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासाची तोडफोड करण्यासाठी आणि तेथे असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांविरोधात हिंसाचार करण्यास प्रोत्साहन दिले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या