Tur Price: सध्या देशात तूर आणि उडदाच्या डाळीचे (tur and urad) दर हे वाढलेले आहेत. मात्र, आता तूर आणि उडदाच्या डाळीच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळं डाळींचे भाव कमी होऊ शकतात. सरकारनं तूर आणि उडीद डाळींवर लादलेली साठा मर्यादा 31 ऑक्टोबरपर्यंत  वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचा परिणाम दरांवर होण्याची शक्यता आहे. 


उत्पादनात घट आणि आयात मंदावण्याच्या शक्यतेमुळं, जूनमध्ये लागवड केलेल्या डाळींच्या वाणांसाठी स्टॉक होल्डिंग मर्यादा किमान तीन महिन्यांसाठी वाढवली जाणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या म्हणण्यानुसार, वर्षाच्या सुरुवातीच्या किमतीच्या तुलनेत बुधवारी तुरीच्या डाळीची किरकोळ बाजारात किंमती 45 टक्क्यांनी वाढून 160 रुपये प्रति किलो झाली आहे. मात्र, अनेक ठिकाणी तूर  विक्रीचा दर हा 170 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. तर उडदाच्या डाळीची किरकोळ किंमत 110 रुपये प्रति किलो आहे. जी सहा महिन्यांपूर्वीच्या किमतीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढली आहे. 


दरम्यान, सरकारनं घाऊक विक्रेत्यांसाठी 200 टन, किरकोळ विक्रेत्यांसाठी 5 टन, प्रत्येक किरकोळ आउटलेटवर 5 टन आणि मोठ्या साखळी विक्रेत्यांसाठी डेपोमध्ये 200 टन साठा ठेवण्याची मर्यादा लागू केली होती. तर आयातदारांसाठी स्टॉक होल्डिंग मर्यादा सीमाशुल्क मंजुरीच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त स्टॉक ठेवण्यास प्रतिबंधित करते. महाराष्ट्रातील लातूरमध्ये सध्या तुरीचे भाव हे 11 हजार 500 रुपये प्रति क्विंटल आहेत. 2016 नंतरच्या प्रथमच तुरीच्या किंमतीत एवढी वाढ झाली आहे. 


मागणी वाढल्यानं दर वाढण्याची शक्यता


व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागणी वाढल्यानं पुढील महिन्यात तुरीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर कमी पाऊस आणि कमी खरीप क्षेत्र यामुळं देशांतर्गत उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंत सुमारे 0.1 दशलक्ष टन तूर डाळीचा मासिक पुरवठा अपेक्षित आहे. जो किंमती खाली आणण्यासाठी पुरेसा नाही. कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी तुरीच्या पेरणी क्षेत्रात 5.6 टक्क्यांची घट झाली आहे. 43 लाख हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली आहे. या पिकाची नोव्हेंबरपर्यंत कापणी अपेक्षित आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Pulses Price Hike: एका वर्षात तूर डाळ 27 टक्क्यांनी महागली; डाळींची अजून भाववाढ होण्याची शक्यता