CM Tejashwi yadav : बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदाची (Bihar DCM) शपथ घेतल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सोबतच केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI), अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि आयकर विभाग या तपास यंत्रणांना देखील आमंत्रण दिलं आहे. पाटणा येथील माझ्या निवासस्थानी या यंत्रणांनी त्यांच्या विभागाचे कार्यालय उघडून त्यांना हवी ती चौकशी करावी, याला आमचा कोणताही आक्षेप नसेल, असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.
यंत्रणांनी माझ्या घरात कार्यालये उघडावीत
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली. त्यानंतर त्यांनी जेडीयू-आरजेडी-काँग्रेस-नेतृत्वाखालील महागठबंधनसोबत पुन्हा एकदा युती केल्यानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यानंतर दिल्लीत बोलताना ते म्हणाले की, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या लोकांनी माझ्या घरात कार्यालये उघडावीत अशी आमची इच्छा आहे. ते आमच्याविरुद्ध जे काही तपास करतील त्याला आमचा आक्षेप नसेल, असं तेजस्वी यादव म्हणाले.
यंत्रणा एखाद्या नेत्यांना घाबरवण्यासाठी वापरल्या जात आहेत
त्यांनी म्हटलं की, बिहारचे उपमुख्यमंत्री असताना 18 महिन्यांच्या कार्यकाळात माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. आमच्याकडे RJD कोट्यातील 18 मंत्री आहेत आणि त्यांच्यापैकी कोणीही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेले नाही, असंही ते म्हणाले. भाजपकडून सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स या यंत्रणा त्यांच्या विरोधात असलेल्या नेत्याला घाबरवण्यासाठी वापरल्या जात आहेत. जर कुणी खरंच भ्रष्टाचार करत असेल तर या यंत्रणांनी खुशाल चौकशी करावी, असंही ते म्हणाले.
बिहारच्या विकासाची पंचसूत्री
तेजस्वी यादव म्हणाले की, बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर शहरांपासून ते खेड्यापाड्यात सर्वसामान्य लोकं आनंदी आहेत. जनतेला सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. औषध, जलसिंचन, शिक्षण, रोजगार यावर सुनावणी आणि कार्यवाही हा सरकारचा अजेंडा असेल. बिहार विधानसभेत सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला की, आम्ही बिहारमधील प्रत्येक हाताला नोकऱ्या देऊ, असंही तेजस्वी यादव म्हणाले.
अधिवेशनात करावे लागणार बहुमत सिद्ध
काल मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन केल्यानंतर त्यांची पहिली कॅबिनेट बैठक बोलावली. तेजस्वी यादव देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत नितीश कुमार यांनी 24 ऑगस्ट रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यांना या अधिवेशनात बहुमत सिद्ध करायचे आहे. बुधवारी नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मार्च 2000 मध्ये नितीश पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर नोव्हेंबर 2005, नोव्हेंबर 2010, फेब्रुवारी 2015, नोव्हेंबर 2015, जुलै 2017, नोव्हेंबर 2020 आणि 10 ऑगस्ट 2022 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.