Coronavirus Updates : दिल्लीमध्ये (Delhi) कोरोना संसर्गाच्या (Corona Update) रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या 24 तासांत 2700 हून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीननुसार, गेल्या 24 तासांत 2726 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये यावर्षी 2 फेब्रुवारीनंतर एका दिवसांत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. तसेच, काल दिवसभरात सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट 14.38 टक्क्यांवर पोहोचला आहे.  महाराष्ट्रातही (Maharashtra Corona Updates) कोरोनाचा आलेख दिवसागणिक वर जाताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं दिल्लीत मास्कसक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातही पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


दिल्लीतील कोरोना रुग्णांनी गेल्या साडेसहा महिन्यांचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी 3028 रुग्ण आढळून आले होते. सक्रिय रुग्णांची संख्या गुरुवारी 8840 वर पोहोचली, जी गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यापूर्वी 6 फेब्रुवारी रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 8869 इतकी होती. दिल्ली सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या 5591 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये कोरोनाचे 523 रुग्ण दाखल आहेत. दिल्लीतील कंटेनमेंट झोनची संख्या 263 इतकी झाली आहे. तर राष्ट्रीय राजधानीत आतापर्यंत 26357 लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.


दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती! महाराष्ट्रातही पुन्हा मास्कसक्ती? 


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीकरांची चिंता वाढवली आहे. देशात पहिल्यांदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दिल्लीतील सार्वजनिक ठिकाणांवर मास्क अनिर्वाय करण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकानं देशात मास्कमुक्ती केली होती. पण पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्याची वेळ आली आहे. अशातच दिल्ली सरकार सातत्यानं लोकांना कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचं आवाहन करत आहे. दिल्लीसोबतच मुंबईसह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. 


महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशाची राजधानी दिल्लीपाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. काल (गुरुवारी) दिवसभरात राज्यात एक हजार 877 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातही कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता दिल्लीपाठोपाठ राज्यातही मास्कसक्ती होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


राज्यात गुरुवारी 1877 नव्या रुग्णांची नोंद


राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायाला मिळत आहे. मंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी एक हजार 877 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 1971 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, बुधवारी राज्यात 1847 नवे रुग्ण आढळले होते तर मंगळवारी राज्यात 1782 नव्या रुग्णांची भर पडली होती.