नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आणखी एक मारेकरी होता का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत विचारण्यात आला आहे. महात्मा गांधींवर तीन गोळ्या झाडल्या होत्या असं पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु नथुराम गोडसेव्यतिरिक्त आणखी एकाने गांधीवर चौथी गोळी झाली होती का, असे अनेक प्रश्न या याचिकेत उपस्थित केले आहेत.


मुंबईतील अभिनव भारतचे विश्वस्त आणि संशोधक डॉ. पंकज फडणीस यांनी ही याचिका दाखल केली आहे.

नवा चौकशी आयोग स्थापन करुन गांधी हत्येमागील मोठं कटकारस्थान उडकीस आणावं, अशी मागणी या याचिकेत केली आहे. तसंच गांधी हत्येच्या तपासाबाबतही याचिकेत प्रश्न उपस्थित केले आहेत. गांधी हत्या हे इतिहासातील दडपलेलं मोठं प्रकरण होतं का? तसंच त्यांच्या मृत्यूसाठी विनायक दामोदर सावरकर यांना जबाबदार ठरवण्यासाठी ठोस आधार होता का, असे प्रश्न याचिकेच विचारले आहेत.

फडणीस यांच्या दाव्यानुसार, "महात्मा गांधींवर चार गोळ्या झाडल्या होत्या. तिसऱ्या आणि चौथ्या गोळीमधील अंतर महत्त्वाचं आहे, कारण गोडसेने 30 जानेवारी 1948 रोजी ज्या पिस्तूलने गांधीजींची हत्या केली होती, त्यामध्ये सात गोळ्यांची जागा होती. पण पोलिसांनी न चाललेल्या चार गोळ्या जप्त केल्या होत्या. अशा परिस्थितीत हे निश्चित आहे की, त्या पिस्तूलमधून केवळ तीन गोळ्या झाडल्या. गोडसेच्या पिस्तूलमधून चौथी गोळी झाडल्याची शक्यता नाहीच. ही गोळी दुसऱ्या मारेकऱ्याच्या बंदुकीतून आली होती."

1966 मध्ये न्यायमूर्ती जे एस कपूर यांचा चौकशी आयोग गांधी हत्येमागील कारस्थान उघड करण्यात अपयशी ठरला होता, असं याचिकेत म्हटलं आहे. नथुराम गोडसे आणि नारायण आपटेसह अन्य आरोपींना दोषी ठरवण्यासाठी तीन गोळ्या झाडल्याचा दावा विविध न्यायालयांनी खरा मानला, यावरही फडणीस यांनी प्रश्न निर्माण केले आहेत.

महत्मा गांधींजींच्या मारेकऱ्यांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी फासावर लटकवलं होतं. तर पुराव्यांअभावी सावरकर निर्दोष ठरले. सावरकरांशी प्रेरित होऊन मुंबईत 2001 मध्ये अभिनव भारतची स्थापना झाली. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम केलं जातं, असा दावा या संस्थेकडून करण्यात आला आहे.