नवी दिल्ली: सीबीएसईनं काल (रविवार) 12वीचा निकाल जाहीर केला. यामध्ये नोएडातील एमिटी इंटरनॅशनल स्कूलची रक्षा गोपाळ ही देशात पहिली आहे. रक्षानं तब्बल 99.6 टक्के मार्क मिळवले आहेत. 500 पैकी 498 मार्क तिने मिळवत तिनं पहिला क्रमांक पटकावला आहे.


सीबीएसई परीक्षेत दुसरा क्रमांक चंदीगडच्या डीएव्ही सेक्टर-8 शाळेच्या भूमी सावंतनं मिळवला आहे. भूमीला 99.4 टक्के मिळाले आहे.

तर तिसऱ्या स्थानी दोन विद्यार्थी आहेत. चंदीगडच्या भवन विद्यालयातील मन्नत लथुरा आणि त्याच शाळेतील आदित्य नैना या दोघानीही 99.2 टक्के गुण मिळवले आहेत.



एबीपी न्यूजशी बातचीत करताना रक्षा गोपाळ म्हणाली की, 'मला टॉप करायचं आहे, असं काही मनात न ठेवता मी परीक्षा दिली. पण या निकालानं फार आनंद झाला आहे. आता मला पॉलिटिकल सायन्स (राज्यशास्त्र) पदवी मिळवायची आहे.'

दरम्यान, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सर्व टॉपर्सना शुभेच्छा दिल्या आहेत.



95 ते 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

95 ते 100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा बरीच वाढ झाली आहे. मागील वर्षी 95 ते 100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 9351 होती. यंदा ही संख्या 10050 झाली आहे.

संबंधित बातम्या:
बारावी CBSE बोर्डाचा निकाल जाहीर, रक्षा गोपाळ देशात पहिली