नवी दिल्ली : महाराष्ट्राला पुरवण्यात आलेल्या पोलिओच्या लसीत टाईप -2  व्हायरस आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाझियाबादमधील बायोमेड कंपनीनं महाराष्ट्राला ही लस पुरवली होती. याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.


महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि ग्रामीण भागातील लहान मुलांना पोलिओच्या लसीकरणासाठी या औषधाचा पुरवठा करण्यात आला होता.  त्यामुळे आतापर्यंत ज्या मुलांना ही पोलीओची लस देण्यात आली त्यांना काही धोका निर्माण झालाय का असा प्रश्न निर्माण झाला आहे.


गाझियाबादमधील एका कंपनीच्या निष्काळीजपणामुळे देशात पुन्हा पोलिओचा धोका निर्माण झाला आहे. पोलिओमुक्त भारत या संकल्पनेला या कंपनीमुळे सुरुंग लागण्याची शक्यता आहे. कारण गाझियाबादमधील बायोमेड कंपनीद्वारे करण्यात आलेल्या लसींमध्ये टाईप-2 पोलिओ व्हायरस आढळल्यानं खळबळ उडाली.


या कंपनीच्या व्हायरसयुक्त लसी मुख्यत्वे महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशात वापरण्यात आल्या असून त्यामुळे या दोन्ही राज्यांना अलर्ट करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने दिली आहे. पोलिओ अभियानांतर्गत या कंपनीने पुरवलेली लस 7 ऑगस्टला पश्चिमी उत्तरप्रदेशातील भागांमध्ये वापरली गेली. त्यानंतर बनारसमधल्या एका मुलाचा पाय दुखू लागल्यानं त्याला हाँस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या मुलाच्या शौचाचे नमुने तपासल्यानंतर त्यात टाईप- 2 व्हायरस सापडल्याचं तपासणीत समोर आलं.


या संपूर्ण प्रकारानंतर कंपनीच्या उत्तर प्रदेशातील प्रयोगशाळांवर छापे टाकून ही औषधं सील करण्यात आली. बायोमेड ही कंपनी इंडोनेशियामधून औषधे मागवून त्यात प्रक्रिया करुन सरकारला पुरवत होती असंही समोर येत आहे. कंपनीचे मॅनेजर सरयू प्रकाश गर्ग व इतर अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवला आहे.


किती धोकादायक आहे ही घटना ?


- ड्रग कंट्रोलर आँफ इंडियाच्या माहितीनुसार टाईप 2 व्हायरस हा जीवघेणा नसला तरी ज्या मुलांनी या लसीचं सेवन केलं आहे, त्यांच्या मलमूत्रामधून इतरत्र संसर्ग वाढण्याची भीती असते.
- 1 एप्रिल 2016 ला भारत सरकारनं आदेश काढून सर्व कंपन्यांना टाईप-2 व्हायरस औषधाची निर्मिती बंद करायला सांगितलं होती.
- देशातील सर्व कंपन्यांनीच सरकारला ही निर्मिती बंद केल्याचं लेखी कळवलं होतं.


खरंतर 2011 पासून भारतात कुठलीच पोलिओ केस न सापडल्यानं 27 मे 2014 रोजी भारत पोलिओमुक्त असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेनं केली. अनेक वर्षे त्यासाठी जनजागृतीची मोहीम चालवली गेली. पण आता सात वर्षानंतर एका औषध कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या मोहिमेला गालबोट लागून पुढच्या पिढीवर संकट निर्माण होत असेल तर ही धक्कादायक बाब आहे.