नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर असून त्यामुळे दरदिवशी देशात चार लाखांच्या जवळपास नव्या रुग्णांची भर पडताना दिसत आहे. पण या लाटेची तीव्रता कदाचित मे महिन्याच्या अखेरपर्यंत ओसरेल असं मत ख्यातनाम विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी व्यक्त केलं आहे. महिला पत्रकारांशी व्हर्च्युअली संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. 


कोरोनाची ही दुसरी लाट कदाचित मे महिन्याच्या मध्यापासून ते महिन्याच्या अखेरपर्यंत ओसरण्याची शक्यता आहे असा आमचा अंदाज सांगतोय असं डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितलं. यासाठी अनेक अभ्यास करण्यात आले असून काही मॉडेलच्या अभ्यासानुसार, जून महिन्याच्या सुरुवातीला ही लाट ओसरेल असंही समोर आलं आहे. या सर्वांचा एकत्रित अभ्यास करता मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाची दुसरी लाट ओसरेल अशी शक्यता आहे असंही त्या म्हणाल्या. 


डॉ. गगनदीप कांग या ख्यातनाम विषाणूतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात. जगप्रसिद्ध रॉयल सोसायटीच्या फेलोपदी निवड झालेल्या त्या पहिल्याच भारतीय महिला आहेत. महिला पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी भारतात वापरण्यात येत असलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींबद्दल असलेल्या अनेक शंकांचेही निरसन केलं. तसेच लवकरच भारतात आणखी काही लसींचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल असंही त्या म्हणाल्या. 


कोरोनाची लस ही नक्कीच लोकांना संरक्षित करते. एकदा का ही लस घेतली की त्यामुळे पुढच्या व्यक्तीमध्ये तो पसरत नाही. त्यामुळे जीवाला असणार धोका कमी होतो. कोरोनाची लस ही कोरोनाचा संक्रमण थांबवते हे नक्की असं मत डॉ. गगनदीप कांग यांनी व्यक्त केलं. 


लॉकडाऊन आवश्यक
देशाला लॉकडाऊन गरजेचा आहे का प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, "भारतात लॉकडाऊन लावल्यास त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. येत्या दोन-तीन आठवड्यात जर आपल्याला कोरोनाची रुग्णसंख्या कमी करायची असेल, त्यावर नियंत्रण आणायचे असेल तर देशात आतापासूनच लॉकडाऊन लावणे आवश्यक आहे. त्याचा परिणाम काहीच दिवसात नक्कीच दिसेल."


महत्वा्च्या बातम्या :