मडगाव : देशभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाच कैक राज्यांनी स्थानिक पातळीवर लॉकडाऊनचे निर्णय घेतले आहेत. काही भागांमध्ये सक्तीचा लॉकडाऊन लागू न करता निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. गोव्यातही असंच काहीसं चित्र आहे. गोव्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत असतानाही इथं लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला नाही, उलटपक्षी निर्बंध आणखी कडक करत प्रवाशांची ये-जा आणि अनेक कार्यक्रमांचं चित्रीकरण इथं सुरु आहे.
परंतु गोव्यात सुरु असणाऱ्या चित्रीकरणाच्या या सत्रांवर आता स्थानिक राजकीय नेतेमंडळी आणि काही नागरिकांचाही विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे. कलर्स वाहिनीर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या रिअॅलिटी शो, 'सूर नवा ध्यास नवा'च्या सेटवर याचीच प्रचिती आली. इथं गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी एकच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं.
गोव्यातील मडगाव येथे असणाऱ्या रवींद्र भवनमध्ये या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरु असतानाच सरदेसाई यांनी तेथे येत विरोध प्रदर्शन केलं. गोव्यातील मडगाव आणि फातोर्डा परिसरात चित्रीकरणामुळंच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
सेलिब्रिटी फॅशन डिझायनर्सही कंगना विरोधात; घेतला मोठा निर्णय
दरम्यान, हे सर्व चित्र पाहता कार्यक्रमाच्या निर्मिती संस्थेकडून आवश्यक त्या सर्व परवानगी घेण्या आल्याचा दावा करण्यात आला. इतकंच नव्हे तर, अखेर गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी मध्यस्ती केल्यानंतर हा तणाव निवळल्याचं सांगण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी अलका कुबल यांनाही अशाच प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. कोरोना संसर्गानं गोव्यातही चिंता वाढवली आहे. याच धर्तीवर इथं 10 मे पर्यंत कडक निर्बंधांचं पालन करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. बुधवारी गोव्यात कोरोनाने 71 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.