नवी दिल्ली : योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर बेभान होऊन डान्स करणाऱ्या महिला पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाला. या महिला पोलीस योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचं सेलिब्रेशन करत असल्याचा दावा करण्यात आला.


पोलिसांच्या गणवेशात असलेल्या या 10 ते 12 महिला बेभान होऊन डान्स करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर एबीपी न्यूजने या व्हिडिओची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला.

व्हिडिओमध्ये 10 ते 12 महिला बेभान होऊन डान्स करत असल्याचं दिसत आहे. मात्र या महिला ज्या ठिकाणी डान्स करत आहेत, ते ठिकाण पोलीस स्टेशन नाही, हे व्हिडिओ पाहून समजतं. कारण त्या ठिकाणी कूलर, कपाट आणि कपडे दिसत आहेत. त्यामुळे हे चित्र पोलीस स्टेशनचं नाही, हे स्पष्ट होतं.

एबीपी न्यूजने या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी अगोदर इंटरनेटवर हा व्हिडिओ सर्च केला. मात्र हा व्हिडिओ एक महिना आधीच इंटरनेटवर अपलोड झालेला असल्याचं समोर आलं. यूट्यूबवरही हा व्हिडिओ तीन आठवडे ते एक महिना अगोदरचा असल्याचं दिसून आलं.

व्हिडिओमध्ये डान्स करत असलेल्या महिला पोलिसच आहेत का, त्या पोलीस असतील तर कोणत्या राज्यातील आहेत, आणि योगी आदित्यनाथ हे पोलिसांमध्ये एवढे लोकप्रिय आहेत का, असे अनेक सवाल उपस्थित होतात.

योगी आदित्यनाथ यांची निवड 18 मार्च रोजी झाली, तर शपथविधी 19 तारखेला झाला. हा व्हिडिओ एक महिना अगोदर अपलोड झालेला आहे. त्यामुळे एबीपी न्यूजच्या पडताळणीत या व्हिडिओचा आणि योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्री म्हणून निवडीचा संबंध नसल्याचं स्पष्ट झालं.

पाहा व्हिडिओ :