मुंबई : महात्मा गांधींचा एक फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतो. या फोटोत महात्मा गांधी एका महिलेसह नाचताना दिसत आहेत. सोशल मीडियावर गांधी जयंती आणि पुण्यतिथीला हा फोटो व्हायरल केला जातो. गांधीजींना बदनाम करण्यासाठी हा फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर केला जातो.

गांधीजींच्या या फोटोत ते एका गोऱ्या महिलेसोबत नाचत आहेत आणि त्यांच्यामागील दोघेजण या दोघांकडे पाहात असल्याचं दिसत आहे. फोटोतील महिला गांधीजींसोबत आनंदानं नाचत आहे, आणि मागचे दोघे त्यांच्याकडे आश्चर्यचकित नजरेनं पाहात असल्याचं दिसत आहे.

हा फोटो जेव्हा तुमच्यासमोर येईल, तेव्हा तुमच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये यासाठी या फोटोमागील सत्य काय याची पडताळणी एबीपी माझानं केली. एबीपीच्या पडताळणीत अहिंसावादी बापू आणि डान्स करणारे बापू यांच्यातील फरक व्हायरल फोटोत अगदी सहजपणे दिसत आहे.

गांधीजींच्या फोटोत त्यांच्या हातावर बायसेप्स दिसत आहेत.मात्र गांधीजींनी तर कधीच बायसेप्स बनवले नव्हते. त्यांच्या आजवरच्या अन्य कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओत त्यांच्या हातावर कोणताही उभारही दिसला नाही. त्यांचे हात खूपच काटक आणि आकारानं बारीक दिसत आहेत.

एबीपी न्यूजच्या पडताळणीमध्ये फोटोतील गांधीजी आणि खरेखुरे गांधीजी यांच्यात आणखी एक विसंगती आढळून आली. फोटोतील गांधीजींच्या पायातील चप्पल आणि महात्मा गांधींची चप्पल यात खूप फरक आहे. फोटोत गांधीजींनी घातलेल्या चप्पलसारखी चप्पल गांधीजी कधीच वापरत नव्हते. फोटोतील चपलेत झिगझॅग डिझाईन आहे, ज्याप्रकारची चप्पल गांधीजी कधीच वापरत नव्हते.



मात्र आता प्रश्न असा उरतो की चप्पल आणि हात गांधीजींसारखे वाटत नसले, तर फोटोतील गांधीजींसारखी दिसणारी व्यक्ती कोण? एबीपी माझाच्या पडताळणीमध्ये या फोटोत गांधीजी नसल्याचं समोर आलं. मग हा फोटो कुणाचा?? हा फोटो Everybody Loves Music फिल्म मधला आहे. ही फिल्म 1945 पूर्वीची आहे.

त्यावेळी गांधीजींना अशाप्रकारे दाखवण्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल गांधी इतिहास विशेषज्ञ भाष्पती राय चौधरी यांनी स्पष्ट केलं, की हा प्रचार चुकीचा आहे. ही युरोपमधील फिल्म आहे, ज्यात गांधीजींना चुकीचं दाखवण्यात आलं आहे.

एका कलाकारानं गांधीजींचा वेश परिधान केला होता. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या या फोटोत गांधीजी नसल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीत सिद्ध झालं आहे.

पाहा व्हिडिओ :