- बीएसएफ कॅम्पमध्ये पुन्हा फायरिंगचा आवाज, लष्कराचं सर्च ऑपरेशन सुरु
- विमानतळ सुरु, प्रवाशांना विमानतळावर जाण्याची परवानगी
- हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदनं स्विकारली आहे.
- श्रीनगरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10 वाजता उच्चस्तरीय बैठक
LIVE : श्रीनगरमध्ये बीएसएफ कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2017 07:34 AM (IST)
श्रीनगरमधल्या बीएसएफच्या 182 व्या बटालियनच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. पहाटे 4.30 च्या सुमारास याठिकाणी 4 ते 5 दहशतवादी शिरले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला.
श्रीनगर : श्रीनगरमधल्या बीएसएफच्या 182 व्या बटालियनच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात बीएसएफचा एक अधिकारी शहीद, तर 4 जवान जखमी झाले आहेत. आत्मघाती हल्ला करणाऱ्या तीनही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं आहे. पहाटे 4.30 च्या सुमारास याठिकाणी हे तीन दहशतवादी शिरले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदनं स्विकारली आहे. दरम्यान श्रीनगर विमानतळापासून हा बीएसएफ कॅम्प अगदी जवळ आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर विमानतळ बंद करण्यात आलं होतं. हल्लेखोर दहशतवादी एका इमारतीत लपले होते, पहाटेपासून दोन्ही बाजूंनी चकमक सुरु होती. आसपासच्या परिसरातील शाळांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून सुट्टी देण्यात आली. हा हल्ला आत्मघाती असल्याचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दहशतवादी बीएसएफ कॅम्पमध्ये घुसण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्यापैकी तिघांनाही कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं आहे. अशी माहिती बीएसएफकडून देण्यात आली. जम्मू काश्मीरच्या बांदीपुरामध्ये 5 जूनला चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. आजच्या सारखाच पहाटे 4 वाजता या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला चढवला होता. हा हल्ला परतवून लावत चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं. याच परिसरात 17 वर्षांपूर्वीही 2000 साली असाच हल्ला करण्यात आला होता. स्फोटकांनी भरलेली गाडी विमानतळात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जैश ए मोहम्मदच्या या हल्ल्यात स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा स्फोटही झाला होता. आजचाही हल्ला जैशनंच केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. LIVE UPDATES