मुंबई : मणिपूरमध्ये (Manipur) शनिवार 27 जानेवारी रोजी दोन सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळ आणि कांगपोकपी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर असलेल्या ठिकाणी ही घटना घडली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
जखमींना उपचारासाठी इंफाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर दोन्ही बंडखोर गट मागे हटले. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जखमींपैकी एकाच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुसऱ्याच्या मांडीला दुखापत झाली आहे.
आठ महिन्यांनंतरही हिंसेतून नाही सावरलं मणिपूर
अनेक कारणं जसं की, जमीन, नैसर्गिक संसाधने आणि राजकीय प्रतिनिधित्व यावरुन मे 2023 मध्ये सुरु झालेल्या कुकी आणि मेईतेई समुदायांमधील जातीय हिंसाचारातून मणिपूर अद्याप पूर्णपणे सावरलेले नाही.60,000 केंद्रीय सुरक्षा दल असूनही आठ महिने उलटूनही मणिपूर गस्त घालत आहेत. आठ महिने उलटूनही मणिपूरचे संकट का संपले नाही, असा सवाल करत विरोधक राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत.
ITLF ने केली सार्वजनिक चर्चा
दरम्यान, इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) ने एका निवेदनात म्हटले आहे की, रचंदपूर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात कुकी समाजाची ही चळवळ पुढे नेण्यावर चर्चा केली. तसेच मणिपूरवर कारवाई करण्यासाठी केंद्रावर दबाव कसा आणायचा, सस्पेंशन ऑफ ऑपरेशन (SoS) ची स्थिती, त्याची चळवळ कशी मजबूत करायची आणि 10 कुकी आमदारांनी काय करावे यावर देखील या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली.
सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन म्हणजे काय?
सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन हा 25 कुकी बंडखोर गट, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात स्वाक्षरी केलेला त्रिपक्षीय करार आहे. ज्याच्या नियमांमध्ये बंडखोरांना छावण्यांमध्ये ठेवणे आणि त्यांची शस्त्रे स्टोरेजमध्ये ठेवणे असे नियम आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून, अनेक SOS शिबिरांमध्ये ठेवलेल्या शस्त्रास्त्रांची संख्या कमी झाल्याचा आरोप होत आहे.