Bihar Politics Nitishkumar :  बिहारमधील अचानक (Bihar Politics) बदललेल्या राजकीय वातावरणात मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) पुढे काय घोषणा करणार, महाआघाडीत राहणार की राजीनामा देऊन भाजपसोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, ते भाजपसोबत गेले तरी राजीनामा देणार नसून ते राजभवनात जाणार असून त्यांच्यासोबत भाजपला पाठिंबा देणारे पत्र असू शकते आणि राष्ट्रीय जनता दलाच्या  मंत्र्यांना बडतर्फ केले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.


भाजपने पाठिंबा दिल्यास नितीशकुमार यांना राजीनामा देण्याची गरज नाही, तेच मुख्यमंत्री राहतील, असे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत नितीशकुमार यांना फक्त राजदच्या आणि त्यांच्यासोबत आघाडीतील मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे लागेल. याचाच अर्थ नितीशकुमार हे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देताही सरकार बदलू शकतात.


2013 मधील घटनेची पुनरावृत्ती होणार?


16 जून 2013 रोजी भाजपशी संबंध तोडल्यानंतर त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या नितीशकुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळातील भाजपच्या 11 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केले. अशा परिस्थितीत नितीश कुमार पुन्हा एकदा 2013 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करू शकतात. मात्र, यावेळी भाजपचे नव्हे तर राजदचे मंत्री बरखास्त केले जातील. 


2013 मध्ये नितीशकुमार यांच्याकडे  आमदारांचे मोठे पाठबळ होते. स्वबळावर ते बहुमताच्या जवळ जात होते. मात्र, या वेळी नितीशकुमार यांच्याकडे फक्त 45 आमदार आहेत. तर, भाजपकडे 78 आमदार आहेत. 


राजकीय अस्थिरता, नितीश सरकारी कामकाजात व्यस्त


मुख्यमंत्री नितीशकुमार शनिवारी सरकारी कामात व्यस्त राहिले आणि विकासकामांसाठी बक्सरला भेट दिली. नितीशकु्मार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागल्यानंतर इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. 


काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना फोन केला पण ते नितीश कुमार यांच्याशी बोलू शकले नाहीत, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, राजदने पाटणा येथे आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत राजदचे नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी अजून खेळ पूर्ण होणे बाकी असल्याचे वक्तव्य केले. 


नितीशकुमारांच्या पक्षाची पुनर्रचना 


नितीशकुमार यांनी एनडीएसोबत जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे. विशेष म्हणजे राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांची गठित कार्यकारिणी बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. वशिष्ठ नारायण सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.  


>> बिहारमधील संख्याबळ


> राष्ट्रीय जनता दल - 79


> भाजप - 78
> जेडीयू - 45
> काँग्रेस - 19
> CPI(ML)L - 12
> हम - 4
> CPI -2 
> CPIM - 2
> अपक्ष,इतर - 1
> MIM - 1
-------------
एकूण - 243