नंतनाग : विशेष पोलीस दलासाठी काम करणाऱ्या तीन काश्मिरी तरुणांचा हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांकडून छळ केला जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दक्षिण काश्मीरमध्ये शूट केलेला असून या तिघांना गद्दार म्हणत त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात येत आहेत.

भरलेल्या बादलीत या तिघांची डोकी बुडवून त्यांना बेदम मारहाण केली जात आहे. त्यांचे केसही कापले जात आहेत, असं व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ दक्षिण काश्मीरमधील अनंतनागचा असल्याची एबीपी माझाच्या सूत्रांकडून मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्याचे प्रकार दहशतवाद्यांकडून सुरु आहेत. काल शोपियान जिल्ह्यात लष्कराच्या जवानांचे गस्तीपथक तैनात होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं वृत्त होतं. या हल्ल्यात दोन जवानांसह एक नागरीक जखमी झाला आहे.

दुसरीकडे कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर लष्करानं सर्वात मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे.

तीन हजारहून अधिक जवान खोऱ्यातील 20 हून अधिक गावांमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, लष्कर-ए-तौयबाचा खतरकनाक दहशतवादी जुनैद मट्टू आपल्या 2 साथीदारांसह कुलगाममधल्या गावात लपून बसला आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

व्हिडीओ पाहा