नवी दिल्ली : भारत आणि चीन (India China Face Off ) अशा दोन्ही राष्ट्रांमध्ये सीमावादावरुन अनेकदा खटके उडत असतात. या परिस्थितीमध्ये सातत्यानं दोन्ही देशांतील सैन्यदलांमध्ये शांततापूर्ण चर्चाही सुरुच आहेत. याच चर्चासत्रांदरम्यान आता चीनच्या माध्यमांकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. लडाखच्या पूर्व भागात असणाऱ्या गलवान खोऱ्यात साधारण 8 महिन्यांपूर्वी भारत आणि चीन या दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये हिंसक झटापट झाली होती. यामध्ये चीनकडून मृत सैनिकांचा अधिकृत आकडा मात्र समोर येऊ दिला नव्हता. पण, आता मात्र पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये चीननं नेमकं किती सैनिकांना गमावलं होतं हे स्पष्ट होत आहे.


मुख्य म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून सदर घटनेबाबतची माहिती देताना चीननं यासाठी भारतीय सैन्यालाच कारणीभूत ठरवलं आहे. भारताकडून गलवान नदीमध्ये अस्थयी स्वरुपातील एक पूल बांधण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं ज्यामुळं 15-16 जूनला हिंसक झटापट झाली असं या व्हिडीओमध्ये भासवण्यात आलं आहे.


सत्यपरिस्थिती म्हणत चीननं भारतीय सैन्यावर एलएसी ओलांडण्याचा आरोप करत भलताच कांगावा केला आहे. याशिवाय भारतीय सैन्यानं सत्य चुकीच्या पद्धतीनं जगासमोर आणल्याचंही म्हटलं होतं. दरम्यान, या व्हिडीओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची बाबही समोर आली. ही बाब म्हणजे यामध्ये चीनच्या सैन्यानं किती जवान गमावले याबाबतची माहिती.


In Pics | पाहा अशा प्रकारे माघारी जातंय चीनचं सैन्य


चेन जियानगाँग, जिओ सियुआन आणि वांग जुओरन या तीन जणांचा गलवानमधील झटापटीत मृत्यू झाला. चीनच्या सैन्याचे नेतृत्व करणारे कर्नल क्यू फेबाओ (रेजीमेंटल कमांडर) हे या झटापटीत गंभीर जखमी झाले होते. त्यांना 'हिरो कर्नल' या उपाधीने गौरवण्यात आल्याचं जाहीर केल आहे.





त्या प्रसंगी नेमकं काय घडलेलं ?


भारत आणि चीनमध्ये 6 जून रोजी मेजर जनरल रँक स्तरावरील चर्चा झाली होती. यामध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमतीही झाली होती. 6 जूनच्या चर्चेनुसार चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत आणखी मागे जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली.


परिणामी भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. घटनास्थळी भारतीय जवानांची संख्या चीनच्या सैनिकांच्या तुलनेने कमी होती. यावेळी चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर लाठ्याकाठ्या, दगड आणि टोकदार हत्यारांना भ्याड हल्ला चढवल्याचंही म्हटलं गेलं. या हल्ल्यात 20 जवान जखमी झाले होते. त्यानंतर आज सकाळी भारतीय लष्कराने एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाल्याची माहिती दिली होती.