श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटना काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. शुक्रवारी इथं असणाऱ्या श्रीनगर जिल्ह्यातील Barzulla भागात एका दहशतवाद्यानं गोळीबार केला. मागील तीन दिवसांमध्ये हा या भागात करण्यात आलेला तिसरा दहशतवादी हल्ला ठरला आहे. या हल्ल्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी दगावल्याची माहिती आहे.


सीसीटीव्ही फूटेज मिळाल्यानंतर आता हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचा शोध घेण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. शिवाय या भागात संरक्षण यंत्रणांकडून शोधमोहिमही सुरु करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस एका दुकानात आले असता त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.


झुरहामा कुपवाडा येथील कॉन्स्टेबल मोहम्मद युसूफ आणि सुहैल अहमद यांना तातडीनं रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. पण, जखमी अवस्थेत असणाऱ्या या दोघांनाही वाचवण्यात रुग्णालय यंत्रणा अपयशी ठरल्या. एएनआय या वृत्तसंस्थेनं सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळालेला एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. या व्हिडीओमध्ये हा दहशतवादी छुप्या पावलांनी येत गर्दीच्या ठिकाणी बेछूट गोळीबार करताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा दहशतवादी लष्कर- ए- तोयबा या संघटनेशी जोडला गेला आहे.


Jammu Kashmir | 23 देशातील राजदूत थांबलेल्या हॉटेलनजीक दहशतवाद्यांकडून गोळीबार









दरम्यान, पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, शहिदांना श्रद्धांजली वाहिली. ओमर अब्दुल्ला यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. शस्त्रविरहीत पोलिसांवर पाठमोरं असतानाच हल्ला चढवणाऱ्या या दहशतवादी कृत्याचा त्यांनी निषेध केला.