Dr. M. S. Swaminathan : मोनकोंबू सांबशिवन स्वामिनाथन म्हणजेच डॉ. एम. एस .स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. कृषी क्षेत्रात केलेल्या महत्वपूर्ण योगदनाबद्दल त्यांना पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्रीसह रॅमन मॅगसेस सारख्या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. याच स्वामीनाथन यांनी बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळातून प्रेरणा घेत कृषी क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आणि या क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले.
डॉ.एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडूमधील कुंभकोणम या ठिकाणी झाला. त्यांना पहिल्यापासूनच शेतीविषयी आवड होती. केरळ विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच 1943 च्या दरम्यान बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळात हजारो लोकांचे भूकबळी गेले. त्याचा परिणाम स्वामिनाथन यांच्या मनावर झाला आणि धान्योत्पादन वाढीच्या विचारांतून त्यांनी कृषीक्षेत्रात काम करण्याचे ठरवले. पुढे त्यांनी देशात कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांनी ‘एम.एस.स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. या रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी कृषीक्षेत्रातील अनेक संशोधने केली.
स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून देखील ओळखले जाते. हरित क्रांती म्हणजे कृषी क्षेत्राकडे तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणांमुळे शेती उत्पादकतेत मोठी वाढ झाली. धान्याची उच्च-उत्पादनक्षम प्रकार विकसित करणे, खते आणि कीटकनाशके वापरणे, कीटक-प्रतिरोधक पिके विकसित करणे, वर्धित अनुवंशशास्त्र असलेल्या संकरित बियाणे इत्यादींचा समावेश करणे होय.
नेदरलँड्सच्या विद्यापीठात संशोधन
स्वामीनाथ यांनी सुरूवातीला नेदरलँड्सच्या वेगेनिंगेन कृषी विद्यापीठ अनुवंशिकी संस्था येथे बटाटा अनुवंशशास्त्र विषयावर संशोधन सुरू केले. या संशोधनासाठी त्यांना युनेस्कोची फेलोशिप मिळत असे. या संशोधनातून त्यांनी सोलॅनमच्या जंगली प्रजातींच्या विस्तृत मशापासून लागवडीखालील बटाटा, सोलॅनम ट्यूबरोजममध्ये जीन हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेचे प्रमाणिकरण करण्यात यश मिळविले.
केंब्रिज विद्यापीठाची पीएचडी
या संशोधनानंतर स्वामीनाथन केंब्रिज युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ अॅग्रीकल्चरमध्ये गेले. तेथे त्यांनी "प्रजाती भेदभाव, आणि सोलॅनम - सेक्शन ट्युबेरियम जनुकातील विशिष्ट प्रजातीतील पॉलीप्लॉईडी ऑफ नेपरी" या प्रबंधासाठी 1952 मध्ये त्यांनी पीएचडी मिळविली.
प्राध्यापक पदाची ऑफर नाकारली
परदेशी शिक्षण घेऊन भारतीय शेतीच्या कार्यात स्वत:ला सुसज्ज करण्यासाठी संशोधनाच्या कार्याबद्दल त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक समाधान असूनही त्यांनी तेथे पूर्णवेळ प्राध्यापक पदाची ऑफर नाकारली. ते 1954 च्या सुरूवातीला भारतात परतले. त्यानंतर त्यांनी आयएआरआय मध्ये त्यांनी आपले संशोधन केले.
स्वामीनाथन आयोगाची स्थापना
देशातील शेतकर्यांची दुरवस्था घालवण्यासाठी 18 नोव्हेंबर 2004 मध्ये आयोगाची स्थापना करण्यात आली. डॉ. एम.एस. स्वामीनाथन हे या आयोगाचे अध्यक्ष होते. 2006 पर्यंत या आयोगाद्वारे सहा अहवाल सादर करण्यात आले आहेत. या अहवालात आयोगाने शेतकर्यांच्या हालाखीची कारणे आणि त्यावर उपाय सुचविण्यात आले आहेत. पण आपल्या देशातील लाल फितींच्या कारभारामुळे आजपर्यंत हा अहवाल न स्वीकारता तसाच आहे.