Verghese Kurien : भारतातील धवल क्रांतीचे जनक म्हणून डॉ. वर्गीस कुरियन (Verghese Kurien) यांचे नाव घेतले जाते. दुग्ध उत्पादनात भारताला अग्रेसर बनवण्यात कुरियन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात वर्गीस कुरियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. देशात 'दुधाचा महापूर' योजनेची संकल्पना त्यांनीच मांडली. कुरीयन यांचा जन्मदिवस 'नॅशनल मिल्क डे' म्हणून साजरा केला जातो. दुग्ध क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दलची माहिती पाहुयात...


मद्रास विद्यापीठातून बी.ई, अमेरिकेत जाऊन मास्टर्स


डॉ. वर्गीज कुरियन यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1921 मध्ये झाला होता. वर्गीज कुरियन यांचा जन्म ब्रिटिश भारतातील (सध्याच्या भारताच्या केरळ राज्यात) कोळ्हिकोड गावातल्या सीरियन ख्रिस्ती कुटुंबात झाला होता. घरी संपूर्ण कुटुंब डॉक्टरी पेशात होते. तरी कुरीयन यांनी मेकॅनिकल इंजिनीरिंगचे शिक्षण घेतले. 1940 साली मद्रास येथील लायोला कॉलेज येथून ते पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी.ई. ही पदवी मिळवली. त्यापुढे त्यांनी टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिट्यूट, जमशेदपूर येथूनही पदवी प्राप्त केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अमेरिकेत जाऊन मास्टर्स पण केले. त्यांच्या अभ्यासाचा विषय हा धातुविद्याशात्र (metallurgy ) होता. अमेरिकेला जाताना त्यांनी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवली होती. ती शिष्यवृत्ती मिळवताना त्यांना काही अटी होत्या. ती म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी भारत सरकारसोबत नोकरी करण बंधनकारक होतं. मास्टर्स पूर्ण झाल्यावर त्यांना चांगल्या कंपन्यांच्या ऑफरही आल्या पण सरकारशी बांधील असल्यामुळं त्यांनी 'आनंद' या गुजरात मधील छोट्याश्या खेडेगावातील दूध डेअरीतील नोकरी सुरु केली. 


म्हशीच्या दुधाची भुकटी तयार करण्याची किमया


दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात वर्गीस कुरियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॉ. कुरियन यांच्या नेतृत्वाखाली 'एनडीडीबी' ने 'ऑपरेशन फ्लड' (धवल क्रांती) सुरु केलं. अवघ्या चार दशकांतच भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला. कुरियन यांनी गुजरात सहकारी दुग्ध पणन महासंघाची (जीसीएमएमएफ) स्थापना केली. 2007 पर्यंत सलग 34 वर्षे ते या महासंघाच्या अध्यक्षपदी होते. ही संस्था 'अमूल' डेअरी उत्पादनांची निर्मिती करते. सारे जग गाईच्या दुधापासून बनवलेली भुकटी वापरत होते. तर भारतात विशेषतः उत्तर व मध्य भारतात म्हशी पालनाचे प्रमाण मोठे आहे. ही बाब जाणून डॉ. कुरियन यांनी म्हशीच्या दुधाची भुकटी तयार करण्याची किमया साधली. यामुळे भारतात दूध प्रक्रिया क्षेत्रात क्रांती झाली. यामुळे जगात अग्रेसर असलेल्या 'नेस्ले' कंपनीला 'अमूल' टक्कर देऊ शकली. कुरियन यांनी केलेल्या या नव्या प्रयोगामुळे त्यांना 'मिल्कमॅन ऑफ इंडिया'चा किताब मिळाला.


त्रिभुवन भाई पटेल यांच्या सहकार्यानं खेडा जिल्हा सहकारी संस्था सुरु


देशाला दुध उत्पादनात स्वयंपूर्ण करण्याव्यतिरिक्त, वर्गीज कुरियन यांनी शेतकर्‍यांची स्थिती सुधारण्यासाठी याची सुरूवात केली. कुरियन यांना 'मिल्कमन ऑफ इंडिया' म्हणूनही ओळखले जाते. ज्या काळात भारतात दुधाची कमतरता होती, त्या काळात कुरियन यांच्या नेतृत्वात दुधाच्या उत्पादनात भारत स्वावलंबी बनण्याचे काम सुरू झाले. त्यांनी त्रिभुवन भाई पटेल यांच्या सहकार्याने खेडा जिल्हा सहकारी संस्था सुरू केली. 1949 मध्ये त्यांनी गुजरातमध्ये दोन गावे सदस्य करून दुग्ध सहकारी संस्था स्थापन केली. कुरियन हा म्हशीच्या दुधापासून पावडर तयार करणारा जगातील पहिला माणूस होता. पूर्वी गायीच्या दुधातून पावडर तयार केली जात असे.


1965 मध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्डची स्थापना 


ग्रामीण भागातील नागरिकांनी शहरी भागातील बंधूप्रमाणे विकासाची फळ चाखायला हवीत असं वर्गीस कुरियन यांचं स्वप्न होतं. त्यासाटी वर्गीस कुरीयन यांनी प्रयत्न केले. वर्गीस एवढ्या वरच थांबले नाहीत. 1965 साली लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्ड ही संस्था स्थापन करण्यात आली. त्याची प्रमुखपदाची जबाबदारी वर्गीस यांना देण्यात आली. त्यांनी दुधाचा महापूर ही योजना अमलात आणली. त्यानुसार तब्बल 700 शहर आणि जवळची गाव यातून दुगाचे जाळं निर्माण केलं. त्यांच्या नेतृत्वात दुग्धक्रांती उदयाला आली. अत्यंत प्रतिकूल परिस्तिथीत, परस्पर विरोधी माणसांची सांगड घालणं, ग्रामीण ते जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा आणि त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कुरियन यांचे प्रयत्न मोठे आहेत. 


1970 मध्ये ऑपरेशन फ्लड 


डॉ. कुरियन यांना दूध अजिबातच आवडत नव्हते. पण कालांतराने त्यांनीच दूध उत्पादनात क्षेत्रात मोलाचा वाटा उचलला. डॉ. कुरियन यांनी 1970 मध्ये ऑपरेशन फ्लड म्हणजेच दूधाचा महापूर ही योजना राबवली. या योजनेमुळे भारतात श्वेत क्रांती संकल्पना उदयास आली. भारत जगात सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जाऊ लागला. याचे श्रेय करुयन यांनाच जाते. डेअरी प्रोडक्टमध्ये अग्रेसर असलेल्या अमूलची स्थापना देखील डॉ. कुरियन यांनीच केली.


अनेक पुरस्कारांनी सन्मान


डॉ. कुरियन यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.  डॉ.कुरियन यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 30 हून अधिक संस्थाची स्थापना केली. त्यांना रेमन मॅगसेसे, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या मानाच्या नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. मूत्रपिंडांच्या आजारामुळे वर्गीस कुरियन यांना नडियाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना 9 सप्टेंबर 2012  त्यांचे रुग्णालयात निधन झाले. पण त्यांचे दुग्ध क्षेत्रात असलेलं योगदान मोठं आहे. दुग्ध क्षेत्रातल्या योगदानाबद्दल आजही त्यांचे नाव घेतलं जातं.


महत्त्वाच्या बातम्या:


Goat Milk Soap : काय सांगता! शेळीच्या दुधापासून बनवला 'साबण', नाशिकच्या महिलांचा अनोखा प्रयोग


Amul चं दूध, दही आणि लस्सी महागली, जाणून घ्या नव्या किंमती