जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नेतृत्त्वात लढली जाईल आणि त्या पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजप पुन्हा एकदा सत्तेत येईल आणि 2019 ला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होती, असा दावाही त्यांनी केला.

काँग्रेसकडून खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याची टीका अमित शाहांनी केली. त्यांच्या पक्षात आता फक्त भ्रष्टाचारी नेते उरले असल्याचं ते म्हणाले. शिवाय पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक जोपर्यंत जिंकणार नाही, तोपर्यंत विजय अपूर्ण आहे, असंही अमित शाहांनी सांगितलं.

वसुंधरा राजेंच्या नावाला महत्त्व कशामुळे?

राजस्थानमध्ये यावेळी वसुंधरा राजे यांच्याव्यतिरिक्त दुसऱ्या चेहऱ्याला संधी दिली जाईल, असं बोललं जात होतं. मात्र अमित शाहांनी सर्व चर्चांना पूर्ण विराम लावला. अमित शाहांनी यातून कार्यकर्ते, आमदार आणि खासदार यांना एक संदेश दिला आहे. तरीही पक्षातला वाद संपुष्टात येईल, याची काही शक्यता नाही.

राजस्थानमध्ये विजय फक्त पंतप्रधान मोदींमुळे मिळाला, असं काही दिवसांपूर्वी कृषी आणि कल्याण मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले होते. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे वसुंधरा राजेंवर निशाणा साधला होता. अध्यक्षपदावरुन वुसंधरा राजे आणि शेखावत यांच्यात वाद झाला होता.

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय अशोक परनामी यांनी 17 एप्रिल रोजी राजीनामा दिला. तेव्हापासूनच भाजप हायकमांड आणि वसुंधरा राजे यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. भाजपने गजेंद्र सिंह शेखावत यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढे केलं तेव्हा याला वसुंधरा राजेंनी विरोध केला. जवळपास 74 दिवस प्रदेशाध्यपद रिकाम होतं, अखेर विजय वसुंधरा राजे यांचा झाला आणि मदन लाल सैनी यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

सैनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात जुलै रोजी जयपूरमध्ये सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी वसुंधरा राजेंसोबत व्यासपीठ शेअर केलं आणि तेव्हाच स्पष्ट झालं, की राजस्थानची निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असून यामध्ये अंतर्गत गटबाजीला बिलकुल जागा दिली जाणार नाही. आता भाजपाध्यक्ष अमित शाहांनी हा संदेश दिला आहे, की राजस्थानमध्ये भाजप एकजूट असून वसुंधरा राजे सर्वमान्य नेता आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते घनश्याम तिवारी यांनी वसुंधरा राजे यांच्याविरुद्ध बंड पुकारत स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. त्यामुळे यावेळी वसुंधरा राजे यांना वगळून दुसऱ्या चेहऱ्याला संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र अमित शाहांनी या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला.

राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंची कामगिरी

राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागा आहेत. भाजपने 2003, 2008 आणि 2013 सालच्या निवडणुकीत वसुंधरा राजेंवर विश्वास दाखवला होता. 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मोदी लाटेत आणि वसुंधरा राजेंच्या नेतृत्त्वात दोन तृतीयांश बहुमत मिळवत 200 पैकी 163 जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला केवळ 21 जागांवर समाधान मानावं लागलं.

2008 मध्येही भाजपने वसुंधरा राजेंच्या नेतृत्त्वातच निवडणूक लढवली होती. त्यावेळी काँग्रेसला 96 जागा मिळाल्या, तर भाजपला 78 जागा मिळाल्या होत्या. मात्र 2003 साली वसुंधरा राजेंच्या नेतृत्त्वात भाजपला 120 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला केवळ 56 जागांवर विजय मिळवता आला. 2013 पासून राजस्थानमध्ये आतापर्यंत 17 पोटनिवडणुका झाल्या आहेत, ज्यामध्ये वसुंधरा राजेंना एकदाही यश मिळालं नाही. त्यामुळे वसुंधरा राजेंविरोधात बंडाचं वातावरण होतं, ज्याला बाजूला सारत अमित शाहांनी वसुंधरा राजेंना संधी दिली.