श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये चकमक सुरु आहे. भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.  पोलीस कर्मचारी सलीम शाहची हत्या करणारे दहशतवादी यामध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी सलीम यांची हत्या करण्यात आली होती.


दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनने जारी केलेल्या एका व्हिडीओमुळे भारतीय सैन्याने ही चकमक सुरू केली. या व्हिडीओत दहशतवादी शहीद समील शाह यांची चौकशी करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील आवाजाचा आधार घेत पोलिसांनी कुलगाममध्ये एका परिसराला घेरावा घातला आणि ऑपरेशन सुरू केलं. सलीम शाहचा हत्येपूर्वी शारीरिक छळ केल्याचंही समोर आलं आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल समील शाह यांचं दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मुतालहामा परिसरातील त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आलं होतं. शाह काही दिवसांच्या सुट्टीवर होते. शाह यांना काही दिवसांपूर्वीच बढती मिळाली असल्याने ते ट्रेनिंगसाठी कठुआ येथे गेले होते. शुक्रवारी आपल्या घरी परतले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं.


दहशतवाद्यांकडून औरंगजेब यांची हत्या
रमजान ईदच्या एक दिवस आधी 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगाजेब यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ईदच्या सुट्टीसाठी घरी परतत असताना दहशतवाद्यांनी मुघल रोडवर त्यांचं अपहरण केलं होतं. औरंगजेब हे अँटी-टेरर ग्रुपचे सदस्य असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली होती.