नवी दिल्ली : पहिल्या (Coronavirus) कोरोना व्हायरसचं संकट टळत नाही तोच जगातील काही राष्ट्रांमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. मुख्य म्हणजे याचा संसर्ग पसरण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सर्वत्र सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. असं असतानाच पहिल्या प्रकारच्या कोरोनावर मात करण्यासाठी म्हणून विकसित करण्यात आलेली लस ही दुसऱ्या व्हॅरिएंटच्या बाबतीत कमी प्रभावी किंवा अकार्यक्षम असेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली.


सध्याच्या लसी या नव्या प्रकारापासून रुग्णांचं रक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा कोणताही पुरावा युके, दक्षिण आफ्रिका अशा राष्ट्रांकडून देण्यात आलेला नाही, असं प्रिन्सिपल साइंटीफिक के. विजय राघवन यांनी सांगितलं.


मंगळवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याचवेळी त्यांनी सध्याच्या लसीबाबत हमी दिली. आपल्या वक्तव्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं. जिथं या व्हॅरिएंट्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे, त्यावरच ही लस निशाणा साधते. लस ही आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीरात अॅन्टीबॉडीज निर्माण करते. त्यामुळं व्हॅरिएंटमध्ये बदल झाला तरीही हा बदल लसीचा प्रभाव कमी करण्यास मात्र पुरेसा पडत नाही. थोडक्यात, लसीचा प्रभाव कमी करत नाही. दरम्यान, आयसीएमआरही कोरोनाच्या या म्युटेशनवर नजर ठेवून आहे.





ब्रिटनहून भारतात परतलेल्या सहाजणांमध्ये कोरोनाचा नवा जिनोम


भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित एकूण सहा जण आढळल्यामुळं आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. युकेमधून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सध्यातरी एकही रुग्ण महाराष्ट्रातील नसून देशाच्या अन्य भागातील आहेत. सहापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि चेन्नईतील रुग्णाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ब्रिटनमधून परतलेले हे सहा जण यूकेमध्ये आढळलेल्या सार्स कोवि-2 च्या नवे स्ट्रेनने संक्रमित आहेत.