Varanasi serial blasts : वाराणसीमधील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी वलीउल्लाह खान याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गाझियाबाद न्यायालयाने वलीउल्ला याला बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. 16 वर्षांपूर्वी वाराणसी येथे साखळी बॉम्बस्फोट झाला होता. यात 20 जणांचा मृत्यू झाला होता. तर शंभर पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. 


वाराणसीमधील संकटमोचन आणि कैंट स्टेशनवर 7 मार्च 2006 रोजी तीन साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यातील संकटमोचन मंदिर आणि छावनी रेल्वे स्थानकावरील बॉम्बस्फोटात जवळपास 20 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटात वलीउल्लाह याचा सहभाग असल्याचे तपासात आढळून आले होते. दोषारोप पत्र दाखल करून न्यायालयात त्याच्याविरोधात खटला सुरू होता. यावर निकाल देताना न्यायालयाने वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा सुनावली.  






याबाबत वकील राजेश शर्मा यांनी सांगितले की, जिल्हा सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत नोंदवलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये वलीउल्लाह याला दोषी ठरवले. निकालाच्या वेळी  सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात प्रसारमाध्यमांना परवानगी देण्यात आली नव्हती. शिवाय कोर्टात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. श्वान पथकाकडून न्यायालयाच्या आवारात वेळोवेळी झडती घेण्यात येत होती. 


दरम्यान, वाराणसीतील बॉम्बस्फोटानंतर वलीउल्लाहच्या बाजूने कोणताही वकील खटला लढण्यास तयार नव्हता. यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण गाझियाबाद न्यायालयात वर्ग करण्यात आले. पोलिसांच्या तपासात या तीन बॉम्बस्फोटात पाच दहशतवाद्यांचा हात असल्याचे निष्पन्न झाले. यातील एक दहशतवादी मौलाना झुबेर यचा सीमेवर सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे.