Nashik News : काश्मिरी पंडितांवरील हल्ल्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी मारेकऱ्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या केली होती. त्यानंतर काश्मिरी पंडितांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. यानंतर देशभरात अनेक ठिकाणी निदर्शनं आणि आंदोलनं करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक शिवसेना आक्रमक झाली असून आज पंचवटीत शिवसेनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं. 


काश्मिरी पंडित राहुल भट यांच्या हत्येनंतर त्या ठिकाणी जनक्षोभ पाहायला मिळत आहेत. त्यामुळे देशासह राज्यातही ठिकठिकाणी याचा निषेध करत हल्ल्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. नाशिकमध्ये शिवसेनेनं आज पंचवटीत आंदोलन करत पाकिस्तानच्या प्रतिकात्मक झेंड्याला चपला मारून हल्ल्याचा निषेध केला. काश्मिरी पंडितांवर हल्ले होत असतांना गृहमंत्री मात्र क्रिकेट खेळण्यात व्यस्त असल्याचं आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आंदोलनादरम्यान भाजप विरोधातही जोरदार घोषणबाजी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली.


काश्मीर खोरं हादरतंय
गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोरं दहशतीखाली असून मागील काही दिवसांत अनेक काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे येथील नागरिक घर पलायन करत आहेत. तर अनेकांनी सुरक्षा देण्याचा आणि सुरक्षित स्थळी हलविण्याची मागणी सरकारकडे केली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या परिस्थिती बिघडत चालली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


टार्गेट किलिंगनंतर मोठ्या प्रमाणात स्थलांतर
8 जूनपासून खीर भवानी यात्रेची तयारी सुरू होणार होती. मंदिराची स्वच्छताही बरीच झाली, मात्र मंदिर परिसरात कर्मचाऱ्यांच्या हत्येचा निषेध सातत्याने सुरूच होता. गेली दोन वर्षे सोडली तर 1994 पासून ही यात्रा अखंडपणे सुरू आहे. मात्र आता परिस्थिती बिघडल्याचे काश्मिरी पंडितांचे मत आहे. सध्या खीर भवानी यात्रा पुढे ढकलण्यात आली असली तरी अमरनाथ यात्राही 30 जूनपासून होणार आहे. अशा स्थितीत भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.