Jan Samartha Portal : केंद्र सरकारने नागरिकांसाठी एक खास पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना आणि या योजनांनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले असून जन समर्थ पोर्टल असे या पोर्टलचे नाव आहे. या पोर्टलमुळे विविध सरकारी कार्यालयात नागरिकांना सारख्या चक्करा माराव्या लागणार नाहीत.
केंद्र सरकारच्या चार कर्ज श्रेणीतील 13 योजना जन समर्थ पोर्टलवर उपलब्ध आहे. तर, 125 हून अधिक कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था या पोर्टलवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पोर्टलचे कौतुक केले असून युवकांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. स्टार्ट अप इंडिया, मुद्रा लोन कोणत्या योजनांतून कर्ज घ्यायचे हे युवकांना निश्चित करता येणार आहे. कर्जासाठी कमी प्रक्रिया होणार असून अधिकाधिक जणांना कर्ज मिळू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वयंरोजगार वाढवण्यासाठी, सरकारच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहचवण्यासाठी हे पोर्टल मोठी भूमिका बजावेल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.
NSDL, आयकर विभाग, UIDAI इत्यादी सरकारी संस्था देखील या पोर्टलवर जोडल्या जातील. यामुळे डेटाची डिजिटल पडताळणी करणे अधिक सोपे होईल आणि कर्जदारांना होणारा त्रास कमी होईल. कर्ज घेणारे लाभार्थी एकाच ठिकाणी वेगवेगळ्या ऑफर्स पाहून त्यांच्या आवडीनुसार पर्याय निवडू शकतील. केंद्र सरकारची , 8 पेक्षा जास्त मंत्रालये, 10 पेक्षा जास्त नोडल एजन्सी आणि 125 हून अधिक कर्जदार एकाच वेळी या पोर्टलवर आहेत.
जन समर्थ पोर्टल म्हणजे काय?
जन समर्थ हे एक डिजिटल पोर्टल आहे जिथे 13 क्रेडिट लिंक्ड सरकारी योजना एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. डिजीटल पद्धतीने लाभार्थी आपली पात्रता तपासू शकतात. पात्र योजनांमध्ये डिजिटल अर्ज करता येऊ शकतो.
अर्ज कसा करावा?
सध्या चार कर्जाच्या श्रेणी आहेत. प्रत्येक कर्ज श्रेणीत सरकारच्या काही योजना आहेत. अर्ज करताना काही सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. त्यानुसार योजनेतंर्गत तुमची पात्रता तपासली जाईल.
कोणत्या दस्ताऐवजांची गरज आहे?
प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळ्या दस्ताऐवज, कागदपत्रांची आवश्यकता आहे. पोर्टलवर अर्ज करण्यासाठी साधारणपणे आधार क्रमांक, मतदार क्रमांक, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट आदींचा समावेश आहे. अर्जदाराला पोर्टलवर आणखी काही माहिती नमूद करावी लागेल.
कोणीही अर्ज करू शकतो का?
कोणताही भारतीय अर्ज करू शकतो. मात्र, कर्जाच्या श्रेणीत तुम्हाला पात्रता तपासावी लागणार आहे आणि जर तुम्ही संबंधित योजना, कर्जासाठी पात्र असाल तर ऑनलाइन माध्यमातून कर्जासाठी अर्ज करू शकता.
अर्जाची स्थिती कशी पाहावी?
अर्जदार वेब पोर्टलवर आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकतो. नोंदणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून साइन-इन करावे. अर्जाची स्थिती पाहण्यासाठी डॅशबोर्डवर माय अॅप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करा.