नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण करण्याच्या योजनेचा शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या कार्यक्रमात 1 बटन दाबून 9 कोटी शेतकरी लाभार्थ्यांना 18 हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांनी केला. पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये थेट अनुदान दिलं जातं. 2 हजार रुपयाप्रमाणं तीनवेळा ही रक्कम बँकेत जमा होते.
पीएम किसान सन्मान योजना लाँच केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकऱ्याला भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यावर सरकारचा भर आहे. आमच्या सरकारने नव्या धोरणाने काम सुरु केले. शेतकऱ्याला भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यावर भर दिला. जगामध्ये काय नवे घडतेय, त्याची माहिती घेतली. सखोल अभ्यास केला आणि त्या दृष्टीने काम केले, असं ते म्हणाले.
शेतकऱ्याची जमीन कोणी घेऊ शकणार नाही
ते म्हणाले की, शेतकऱ्याची जमीन कोणी घेऊ शकणार नाही. शेतकऱ्याच्या जीवनातील आनंद हा सर्वांचा आनंद आहे. आधी पीक वाया जायचे आता विकले जाते. कायद्यांवरुन शेतकऱ्यांच्या जमिनीवरुन भ्रम निर्माण केला जात आहे, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, आज रुपया चुकीच्या माणसाच्या हातात जातात नाही. आज दिल्लीवरुन रुपया निघतो, तेव्हा तो त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होतो. संगणकाच्या एका क्लिकवरुन नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा झाले. यात कुठला कट नाही, हेराफिरी नाही. हेच सुशासन आहे, असं मोदी म्हणाले.
बंगालमधील 70 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित
पंतप्रधान म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळतोय. पण फक्त पश्चिम बंगालमधील 70 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. कारण बंगालमधील सरकार राजकीय कारणामुळे त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू देत नाहीय. यात राज्याला एक पैसा भरायचा नाही. पश्चिम बंगालमध्ये तीस वर्ष एका पक्षाचे सरकार होते. त्याच पक्षाचे लोक आता पंजाबमध्ये येऊन शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत. तुमच्या मनात शेतकऱ्यांबद्दल इतके प्रेम आहे मग, पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पैसे मिळावे म्हणून का आंदोलन केले नाही ? असा सवाल मोदींनी केला.
आधीच्या सरकारच्या धोरणामुळे छोट्या शेतकऱ्याचे नुकसान
पंतप्रधान म्हणाले की, बंगालचे ज्यांनी नुकसान केले ते आता दिल्लीत आंदोलन करतायत. पंजाबच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. त्याच पक्षाचे केरळमध्ये सरकार आहे. तिथे एपीएमसी नाही का? मग केरळमध्ये एपीएमसीसाठी आंदोलन का करत नाही? असा सवाल मोदींनी केला. आधीच्या सरकारच्या धोरणामुळे छोट्या शेतकऱ्याचे नुकसान झाले. छोट्या शेतकऱ्यांना बँकांकडून पैसे मिळत नव्हते कारण त्यांच्याकडे बँक खाते नव्हते. छोट्या शेतकऱ्यांना पाणी, वीज मिळत नव्हती. ते कोणाच्या गणतीमध्येच नव्हते. इतकी वर्ष सत्ता उपभोगली पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून दिले. गरीब शेतकरी अजून गरीब झाला, असं देखील मोदी म्हणाले.
काय आहे पीएम किसान योजना?
पीएम किसान योजना अर्थात शेतकरी सन्मान निधी योजना 2019 पासून लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. आतापर्यंत 96 हजार कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे. या योजनेचं वार्षिक बजेट हे 75 हजार कोटी रुपये इतकं आहे.
हा कार्यक्रम का महत्वाचा?
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला विरोध म्हणून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अशा प्रकारची रक्कम जमा करण्याचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या आधीही अशा प्रकारची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. पण शेतकरी आंदोलन सुरु असताना हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कशा प्रकारे घेतंय हे दाखवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारतर्फे करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला महत्व प्राप्त झालं आहे.