Vande bharat: नवी दिल्ली : मोदी सरकारने मोठ्या दिमाखात आणि भारतीय रेल्वेचा कायापालट होत असल्याचे सांगत वंदे भारत (Vande Bharat) ट्रेनचे अनावरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच आणखी तीन वंदे भारत हायस्पीड रेल्वेचं लोकार्पण केल्यामुळे देशात सद्यस्थितीत धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची संख्या 100 पार झाली आहे. विशेष म्हणजे वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असून दैनिक प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसून येते. त्यातच, आता वंदे भारत स्लीपर ट्रेनही पुढील काही महिन्यांत प्रवाशांच्या सेवेत हजर राहणार आहे. मात्र, आज वंदे भारत ट्रेनचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral video) झाला आहे. त्यामध्ये, जुन्या काळातील रेल्वे इंजिनाच्या सहाय्याने वंदे भारत ट्रेनला ओढून नेताना दिसून येते. आता, या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत विरोधकांकडून मोदी (Narendra Modi) सरकारला लक्ष्य केलं जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही व्हिडिओ ट्विट करुन मोदी सरकारला चिमटा काढला आहे. तर, रेल्वेनेही या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. 


नवी दिल्ली येथून बनारसला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आज सकाळी इटावा येथे तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे ती जागेवच थांबविण्यात आली. वंदे भारत हायस्पीड ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ट्रेनला तिथंच थांबवण्यात आलं. त्यानंतर, संबंधित रेल्वेच्या टीमला घटनस्थळावर आणून ट्रेन सुरू करण्याचे प्रयत्न झाले. विशेष इंजिनिअर्स आणि टीमही सातत्याने प्रयत्न करत होती. मात्र, वंदे भारतचं इंजिन सुरू करण्यास त्यांना अपयश आले. त्यामुळे, एका मालगाडीच्या इंजिनच्या सहाय्याने वंदे भारत ट्रेनला ओढत नेण्यात आले. इटावा येथील घटनास्थळावरुन ट्रेनला भरथना रेल्वे स्थानकवर नेण्यात आलं. त्यावेळी, ट्रेनमधील प्रवाशांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. प्रवाशांच्या वेळेचं नियोजन आणि पुढील काही योजनांची फसगत होऊ लागल्यामुळे प्रवासी संतापले होते. त्यानंतर, भरथना रेल्वे स्टेशनवर प्रशानाने शताब्दी एक्सप्रेस आणि अयोध्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला थांबवून बंद पडलेल्या वंदे भारत ट्रेनमधील 750 प्रवाशांचे स्थलांतर केले. या दोन ट्रेनच्या मदतीने प्रवाशांना कानपूरला पोहोचविण्यात आले. 


रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण


कानपूरहून बनारस जाणाऱ्या सर्वच प्रवाशांना श्रमिक शक्ती एक्सप्रेसमधून बनारसला पोहोचविण्यात आले. प्रयागराज रेल्वे विभागाचे प्रो. अमित कुमार सिंह यांनी फोनवरुन माहिती देताना सांगितले की, बनारस वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 750 प्रवासी होते, सर्वच प्रवाशांना इतर दोन ट्रेनच्या मदतीने त्यांच्या, नियोजित व इच्छितस्थळी पोहोचविण्यात आले आहे. सकाळी 9.15 वाजता वंदे भारत बनारस एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रेन थांबविण्यात आली होती. सध्या ट्रेनला भरथना रेल्वे स्टेशनवर उभं करण्यात आलं असून इंजिनिअर्स व तांत्रिक टीमकडून दुरुस्ती करण्यात येत आहे.  






हेही वाचा


... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं