Sambhajiraje chhatrapati: मुंबई : मराठवाडा आणि विदर्भात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमुळे तेथील शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून पिके पूराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंसह विरोधकांनी येथील पूरस्थितीचा पाहणी दौरा केल्यानंतर आता माजी खासदार आणि संभाजीराजे छत्रपती यांनी आज मराठवाड्यातील नांदेड, बीड व परभणी भागात दौरा करत पाहाणी केली. यावेळी, संभाजीराजेंनी पुन्हा एकदा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) हल्लाबोल केला.  मुसळधार पावसामुळे (Rain) मराठवाड्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असतानाही धनंजय मुंडेंनी बीडमध्ये (Beed) सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावरून संभाजीराजेंनी नांदेडनंतर परभणीतही धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.   


कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर टीका करताना पाणी सुकल्यानंतर हे दौरे सुरू झाल्याचं म्हटलं. आता, संभाजीराजेंनी गुडघ्या एवढा पाण्यात उभे राहून धनंजय मुंडेवर हल्लाबोल केला. मी छत्रपती घराण्याचा आहे, शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे आदर्श माझ्यापुढे आहेत. अनेकांना वाटते मी आताच बाहेर निघालोय, पण माझा ट्रॅक रेकॉर्ड आधी लोकांनी पाहिला पाहिजे. केव्हा केव्हा मी गेलो. दुष्काळ असो वा ओला दुष्काळ अनेकवेळा मी इथे गेलोय. काहीतरी राजकीय बोलायचं आणि विषय डायव्हर्ट करायचा, असं काम केलं जातंय. सरकार म्हणून तुम्ही काय देणार आहात म्हटलात ते पहिले द्या आणि नंतर समोरासमोर येऊन बोला, असे म्हणत संभाजीराजेंनी धनंजय मुंडेंना सवाल केला. तसेच, परळीत सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे आणि बोट छत्रपतीवर ठेवायचं. पहिले तुम्ही आत्मचिंतन करा, तुम्ही कसले सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. सांस्कृतिक कार्यक्रमाखाली कसले कार्यक्रम झाले, ते शोभणार आहे का महाराष्ट्राला? याचे उत्तर असेल तर समोरासमोर बोलू, आधी महाराष्ट्राला सांगा ह्या दहा दिवस कसले कार्यक्रम तुम्ही घेतले, मग समोरासमोर बोलू, अशा शब्दात संभाजीराजेंनी मुंडेंवर निशाणा साधला. तर, ज्यावेळी शेतकरी अस्वस्थ आहे, तेव्हा हे सगळं न शोभणारं असल्याचंही संभाजीराजेंनी म्हटलं.


नांदेड जिल्ह्यातही संभाजीराजेंचा दौरा


छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेडमधील हदगाव तालुक्यातील उंचाडा, मारलेगाव आणि धानोरा येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांना ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे तिथे पंचनामे करण्याची गरज नाही, कृषिमंत्री म्हणाले. पण मुख्यमंत्री म्हणाले की, पंचनामे करावे लागतील. त्यानंतरच मदत जाहीर होईल, याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की,  त्यांनी इथे येऊन बघावं. मी शेतात जाऊन पाहणी केली. मी गाडीतून पाहणी केलेली नाही. बाकी आमदार, खासदारांना इथे यायला वेळ नाही का? कृषिमंत्र्यांनी तर इथे यायलाच पाहिजे ना. तुम्ही कृषिमंत्री आहात, अशी टीका त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर केली.