Vande Bharat Express Accident : देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसचा (Vande Bharat Express) पुन्हा एकदा अपघात (Accident) झाला आहे. दिल्लीहून (Delhi) भोपाळला (Bhopal) जाणाऱ्या ट्रेनचा ग्वाल्हेरमध्ये (Gwalior) अपघात झाला. ट्रेनसमोर गाय (Cow) आल्याने हा अपघात झाला. ही घटना गुरुवारी (27 एप्रिल) संध्याकाळी 6.15 च्या सुमारास घडली. गायीच्या धडकेमुळे गाडीचे बोनेट उघडून समोरील भागाचे नुकसान झालं. सुदैवाने यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही
अपघातानंतर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ग्वाल्हेरच्या डबरा स्टेशनवर सुमारे 15 मिनिटे उभी होती. त्याचवेळी ट्रेन पाहण्यासाठी आजूबाजूला लोकांची गर्दी झाली होती. माहिती मिळताच आरपीएफ पोलिसांचा ताफाही घटनास्थळी दाखल झाला होता. तर रेल्वेच्या तांत्रिक कर्मचार्यांनी स्टेशनवरच बोनेट दुरुस्त केला, त्यानंतर ट्रेन तिथून रवाना झाली.
याआधी वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात
दरम्यान वंदे भारत ट्रेनला अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही वंदे भारत एक्सप्रेसला अनेकदा अपघात झाले आहेत. वंदे भारत ट्रेनला जनावरं-गुरं आदळल्याच्या घटनांमुळे रेल्वे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यांना रोखण्यासाठी रेल्वेकडून विविध प्रयत्न सुरु आहेत.
या मार्गावर 1 एप्रिललाच वंदे भारतला हिरवा झेंडा
1 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ ते मध्य प्रदेश या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होती. ही गाडी सुरु होऊन महिनाही उलटला नाही तोच तिला अपघात झाला आहे. वंदे भारत एक्स्प्रेसने भोपाळच्या राणी कमलापती स्थानकापासून नवी दिल्ली स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी 7 तास 50 मिनिटे लागतात. गुरुवारीही ट्रेन आपल्या नियोजित वेळेवर नवी दिल्ली स्थानकावरुन भोपाळला रवाना झाली. त्याचवेळी ग्वाल्हेरच्या डबरा स्टेशनजवळ रुळावर उभ्या असलेल्या गायीला ट्रेनची धडक बसली.
रेल्वेचा आधुनिकतेवर भर
दुसरीकडे भारतीय रेल्वे सध्या आधुनिकतेवर भर देत आहे. रेल्वे स्थानकांची सुधारणा केली जात आहे. नवीन हायस्पीड गाड्या सुरु केल्या जात आहेत. या मालिकेत सरकारने भविष्यात संपूर्ण भारतात 400 वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे सुमारे 1600 डबे तयार केले जातील, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते. यापैकी प्रत्येक ट्रेनला आठ ते नऊ कोटी रुपये खर्च येणार आहे. नवीन वंदे भारत गाड्या जास्तीत जास्त ताशी 200 किमी वेग गाठू शकतील, असं सरकारचं म्हणणं आहे.