नवी दिल्ली: रामायणामध्ये ज्या संजीवनी बुटीने दशरथ पुत्र लक्ष्मणाला नवजीवन दिले होते, त्याच्या शोधासाठी उत्तराखंडाच्या हरिश रावत सरकारने समिती स्थापन केली आहे. त्यामुळे या बुटीचा शोध आता लवकरच लागणार आहे.

 

त्रेतायुगातील राम-रावण यांच्यातील युद्धामध्ये मेघनादने आपल्या शक्तींनी लक्ष्मणाला मुर्छित केले होते. तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी वैद्यांनी हिमालयातील संजीवनी बुटी आणण्याचा सल्ला दिला. संजीवनी बुटी आणण्यासाठी पवनपुत्र हनुमानाला हिमालयात पाठवण्यात आले. मात्र, हिमालयात त्याची ओळख हनुमंतांना न पटल्याने त्यांनी थेट द्रोणागिरीच उचलून आणला, आणि लक्ष्मणाचे प्राण वाचवले.

 

आयूष विभाग घेणार शोध

उत्तराखंडमधील आयूष विभागाने आयुर्वेदीक तज्ज्ञांची समिती स्थापन केली असून ही समिती लवकरच द्रोणागिरीच्या खोऱ्यात पोहचून या बुटीचा शोध घेणार आहेत. उत्तराखंड सरकारमधील आयूषमंत्री सुरेंद्र सिंह नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समितीमध्ये एकूण चार सदस्य असणार असून, पुढील महिन्यापासून ही कमेटी आपले काम सुरु करणार आहेत.

 

आयुर्वेदीक उत्पादनांची मोठी मागणी

 

जगभरात सध्या आयुर्वेदीक उत्पादनांची मोठी मागणी असून, दिवसेंदिवस या उद्योगाला मोठी बाजारपेठ मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर अशा एखाद्या चमत्कारिक बुटीचा शोध लागल्यास या उद्योगाला मोठी दिशा मिळणार आहे.

 

या शोधासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली होती. मात्र, केंद्राने यास नकार दिल्याने उत्तराखंड सरकारने स्वत:च यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

जंगलातील वणव्याने अनेक औषधी वनस्पती नष्ट

 

उत्तराखंड देशातील सर्वात जास्त आयुर्वेदीक वनस्पती मिळणारे राज्य आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत या भागातील जंगलात लागलेल्या वणव्याने अनेक दुर्लभ औषधी वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे अतिशय दुर्मिळ असणारी ही वनस्पती देखील लुप्त झाल्याचे मानले जात आहे.

 

संजीवनी बुटीला शोधून काढणे हे अतिशय अवघड काम असल्याचे स्वत: आयूष मंत्री नेगी यांनी म्हणले आहे. पण तरीही राज्य सरकारने यासाठी 25 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे.